कोणी कितीही मोठा खेळाडू असला तरी चुकीला माफी नाहीच, असं धोरण बीसीसीआयनं अवलंबल्याचं दिसून येत आहे. आयपीएल सामने अटातटीचे होत असल्यानं दिवसागणिक उत्कंठा वाढत असली तरी, खेळाडूंसह संघांनी नियमांचं पालन केलंच पाहिजे. अन्यथा कारवाई अटळ, असाच पवित्रा बीसीसीआयने घेतला आहे. गेल्या काही दिवसांपासून नियमांचं उल्लंघन करणाऱ्या खेळाडूंवर कारवाईचा धडाका लावला असून, बेंगळुरू विरुद्ध मुंबई यांच्यात काल झालेल्या सामन्यानंतरही मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पंड्या आणि मैदानावर पंचांच्या सूचना न पाळणाऱ्या बेंगळुरूचा अष्टपैलू खेळाडू टीम डेविडवर मोठी कारवाई केली आहे.
मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू यांच्यात काल, रविवारी हायव्होल्टेज सामना झाला. यात बेंगळुरूला विजय मिळाला. तर मुंबई इंडियन्सला सलग तिसऱ्या सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले. या सामन्यात नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी बेंगळुरूचा ऑलराउंडर टीम डेविड याच्यावर कारवाई केली आहे. सामन्याच्या मानधनाच्या २५ टक्के दंड आकारला असून, त्याला डेमेरिट पॉइंटही देण्यात आला आहे. आयपीएलच्या कोड ऑफ कंडक्टच्या लेव्हल १ चे उल्लंघन केल्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे.
सामना सुरू असताना मैदानातील पंचांच्या सूचनांचे पालन केले नाही, असा आरोप टीम डेविडवर आहे. १८ व्या ओव्हरनंतर पंचांनी बॉल बदलण्याचा निर्णय घेतला. डेविडनं तो बॉल घेतला. खरे तर तो पंचांना लगेच परत देणे अपेक्षित होते. पण त्याने तसे केले नाही. बऱ्याचदा पंचांनी त्याला सांगितले. पण डेविडने काहीही ऐकलं नाही. दुसऱ्यांदा २० व्या ओव्हरमध्येही तीच चूक पुन्हा केली. पंचांनी सांगितल्यानंतरही त्याने बॉल लगेच परत केला नाही. डेविडने ही चूक कबूल केली. मॅच रेफरींनी दिलेली शिक्षा त्याने मान्य केली.
मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पंड्यावरही बीसीसीआयने कारवाई केली आहे. कालच्या सामन्यातील स्लो ओव्हर रेटमुळे दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. यंदाच्या आयपीएलमधील त्याची ही पहिलीच चूक होती. त्यामुळे त्याच्यावर अवघ्या १२ लाख रुपयांची दंडात्मक कारवाई केली आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या खेळाडूंवर कठोर कारवाई होणारच, असेच या कारवाईतून दिसून येते.
बेंगळुरूचा तिसरा रॉयल विजय
मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू यांच्यात १२ एप्रिलला मुंबईच्या वानखेडे मैदानात सामना झाला. बेंगळुरूने मुंबई इंडियन्सला १८ धावांनी पराभूत करून या मोसमातील तिसरा विजय मिळवला आहे. तर पाच वेळचा चॅम्पियन संघ असलेल्या मुंबईला सलग तिसऱ्या पराभवाला सामोरे जावे लागले. बेंगळुरूने प्रथम फलंदाजी करताना ४ बाद २४० धावा केल्या होत्या. हे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या मुंबईच्या संघाला २० षटकांत २२२ धावाच करता आल्या.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.