ICC ODI World Cup Venues: पुणेकरांची प्रतीक्षा अखेर संपली आहे. तब्बल २७ वर्षांनंतर पुण्यात वर्ल्ड कपच्या सामन्यांचे आयोजन केले जाणार आहे. मंगळवारी(२७ जून) बीसीसीआय आणि आयसीसीने आगामी वर्ल्ड कप २०२३ स्पर्धेसाठीचं वेळापत्रक जाहीर केलं आहे.
या स्पर्धेतील ५ सामने पुण्यातील गाहुंजे स्टेडियमवर रंगणार आहे. तर महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनला पहिल्यांदाच वर्ल्ड कप सामना होस्ट करण्याची संधी मिळाली आहे. त्यामुळे हा पुणेकरांसाठी ऐतिहासिक क्षण असणार आहे.
आता तुहालाही प्रश्न पडला असेल की, पुण्यात शेवटचा वनडे सामना केव्हा आणि कुठल्या संघांमध्ये खेळला गेला होता. तर हा सामना २९ फेब्रुवारी १९९६ रोजी खेळला गेला होता. पुण्यातील स्वारगेट जवळ असलेल्या नेहरू स्टेडियमवर वेस्ट इंडिज आणि केनिया हे दोन्ही दोन्ही संघ आमने सामने आले होते. १९९६ वर्ल्ड कप स्पर्धेचे आयोजन देखील भारतात करण्यात आले होते.
आयसीसी वर्ल्ड कप २०११ वर्ल्ड कप स्पर्धेत देखील पुण्याला सामना होस्ट करण्याची संधी मिळाली होती. मात्र त्यावेळी पुण्यातील गाहुंजे स्टेडियमचं काम सुरु होतं. स्टेडियम खेळण्यासाठी तयार नसल्याने सामने होस्ट करण्याची संधी हातातून निसटली होती. हे बांधकाम २०१० मध्ये सुरु होणार होतं. मात्र काही कारणास्तव ते पुढे ढकलल्याने, हे काम २०१२ मध्ये सुरु झालं होतं. (Latest sports updates)
पुण्यात रंगणार वर्ल्ड कपचे ५ सामने..
आगामी वर्ल्ड कप २०२३ स्पर्धेत गाहुंजे स्टेडियमवर ५ सामने रंगणार आहेत. ज्यात भारत विरुद्ध बांग्लादेश, अफगाणिस्तान विरुद्ध क्वालिफायर २, न्यूझीलंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका,इंग्लंड विरुद्ध क्वालिफायर १ आणि ऑस्ट्रेलिया विरुद्ध बांग्लादेश या सामन्यांचा समावेश आहे.
भारत विरुद्ध बांग्लादेश- १९ ऑक्टोबर, २०२३
अफगाणिस्तान विरुद्ध क्वालिफायर २- ३० ऑक्टोबर, २०२३
न्यूझीलंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका- १ नोव्हेंबर, २०२३
इंग्लंड विरुद्ध क्वालिफायर १- ८ नोव्हेंबर, २०२३
ऑस्ट्रेलिया विरुद्ध बांग्लादेश- १२ नोव्हेंबर,२०२३
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.