आयपीएल २०२७ च्या आधी मुंबई इंडियन्स टीममध्ये मोठा बदल झाला आहे. श्रीलंकेचा माजी कर्णधार महेला जयवर्धने याने टीमच्या हेड कोच पदाचा राजीनामा दिलाय. मुंबई इंडियन्सने १७ ऑक्टोबर निवेदन जारी करून याबाबत माहिती दिली. जयवर्धनेच्या मार्गदर्शनाखाली मुंबई इंडियन्सने तीन वेळा आयपीएलचे विजेतेपद पटकावलंय. त्यामुळे तो टीमच्या सर्वात यशस्वी कोचपैकी एक ठरलाय.
महेला जयवर्धने याचं मुंबई इंडियन्ससोबत जवळपास दहा वर्षांचं नातं राहिलंय. २०१७ मध्ये पहिल्यांदा त्याची टीमच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती झाली. २०२२ पर्यंत त्याने ही जबाबदारी सांभाळली. त्यानंतर २०२४ मध्ये पुन्हा एकदा त्याच्याकडे हेड कोचपदाची जबाबदारी सोपवण्यात आली. २०२६ पर्यंत तो टीमसोबत काम करत होता. त्याच्या मार्गदर्शनाखाली खेळाडूंमध्ये शिस्त, एकमेकांना साथ देण्याची भावना आणि टीममधील चांगला ताळमेळ यावर विशेष भर देण्यात आला.
मुंबई इंडियन्सच्या मालकीण नीता मुकेश अंबानी यांनी महेला जयवर्धनेच्या कामाचं कौतुक केलंय. त्याच्या शांत स्वभावाचं नेतृत्व, प्रामाणिकपणा आणि क्रिकेटप्रती असलेली निष्ठा टीमसाठी महत्त्वाची ठरल्याचं त्यांनी सांगितलंय.
नीता अंबानी म्हणाल्या, "महेलाने अनेक वर्षे मुंबई इंडियन्ससाठी महत्त्वाचं योगदान दिलंय. त्याच्या नेतृत्वासाठी आणि टीमप्रती असलेल्या बांधिलकीसाठी आम्ही त्याचे आभारी आहोत. आम्ही एकत्र अनेक चांगले क्षण अनुभवले आणि अनेक आठवणी तयार केल्या. या आठवणी आम्ही नेहमी जपून ठेवू. महेला कायम आमच्या वन फॅमिलीचा भाग राहील."
मुंबई इंडियन्सच्या हेड कोचपदाचा राजीनामा दिल्यानंतर महेला जयवर्धने भावूक झाला. त्याने टीममधील खेळाडू, प्रशिक्षक आणि चाहत्यांचे आभार मानले. नीता अंबानी आणि आकाश अंबानी यांनी दाखवलेला विश्वास, दिलेली साथ आणि त्यांच्यासोबत निर्माण झालेले मैत्रीचं नातं हे आपल्या प्रवासातील महत्त्वाचा भाग असल्याचंही त्याने सांगितलंय.
मुंबई इंडियन्ससोबत काम करताना अनेक आठवणी तयार झाल्या. या काळात कठीण प्रसंगांचाही सामना करावा लागला. मात्र सर्वांनी मिळून अशा काही गोष्टी साध्य केल्या, ज्यांचा प्रत्येकाला अभिमान वाटू शकतो, असं जयवर्धनेने सांगितलं. त्याने मुंबई इंडियन्सला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तसंच ही टीम आपल्या मनात नेहमीच खास स्थानावर राहील, अशी भावना व्यक्त केली.
२०२२ मध्ये महेला जयवर्धने याची मुंबई इंडियन्सच्या ग्लोबल हेड ऑफ परफॉर्मन्स या पदावर नियुक्ती करण्यात आली होती. या भूमिकेत त्याने वेगवेगळ्या देशांमध्ये होणाऱ्या टी-२० लीगमध्ये मुंबई इंडियन्सचा विस्तार करण्यासाठी काम केलं. तसंच वेगवेगळ्या टीम्समध्ये क्रिकेट खेळण्याची एकसारखी पद्धत आणि विचार विकसित करण्यावर त्याने भर दिला.
या काळात मुंबई इंडियन्स महिला टीम, एमआय न्यूयॉर्क आणि एमआय एमिरेट्स या टीम्सने आपापल्या स्पर्धांमध्ये विजेतेपद पटकावलंय. या यशामुळे जगभरातील क्रिकेटमध्ये मुंबई इंडियन्सची ओळख अधिक मजबूत झाली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.