

भारतीय महिला क्रिकेट टीमची फलंदाज पूनम राऊत हिने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केलीये. गुरुवारी सोशल मीडियावर पोस्ट करत तिने हा निर्णय सांगितला. पूनमने टेस्ट, वनडे आणि टी-२० अशा तिन्ही प्रकारांत भारताचं प्रतिनिधित्व केलंय. मात्र २०२१ नंतर तिला टीम इंडियामध्ये खेळण्याची संधी मिळाली नव्हती. ऑक्टोबर २०२१ मध्ये तिने भारताकडून शेवटचा सामना खेळला होता.
पूनमने २००९ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. देशांतर्गत क्रिकेटमध्ये ती मुंबईच्या टीमकडून खेळत होती. वयाच्या ३७ व्या वर्षी तिने तिच्या दहा वर्षांहून अधिक काळ चाललेल्या क्रिकेट कारकिर्दीला पूर्णविराम दिलाय.
२०१७ च्या महिला वर्ल्डकपमध्ये पूनमने आपल्या फलंदाजीने सर्वांचे लक्ष वेधून घेतलंय. या स्पर्धेत तिने एकूण ३८१ रन्स केले होते. यामध्ये इंग्लंडविरुद्ध लॉर्ड्स मैदानावर झालेल्या अंतिम सामन्यात केलेल्या ८६ रन्सचाही समावेश होता. तिच्या या खेळीमुळे त्या वर्ल्डकपमधील तिच्या कामगिरीची विशेष चर्चा झाली होती.
निवृत्तीची घोषणा करताना पूनमने सोशल मीडियावर त्याच्या क्रिकेट प्रवासाबद्दल भावना व्यक्त केल्या. मुंबईच्या रस्त्यांपासून ते भारतीय टीमची जर्सी घालण्यापर्यंतचा प्रवास एखाद्या आशीर्वादासारखा असल्याचं तिने म्हटलंय.
या प्रवासात अनेक त्याग करावे लागले, संघर्ष करावा लागला आणि अनेक अविस्मरणीय विजय अनुभवायला मिळाले, असंही तिने म्हटलंय. या काळात मिळालेले कठीण धडे आणि आठवणी आयुष्यभर जपून ठेवणार असल्याचं पूनमने तिच्या पोस्टमध्ये लिहिलंय.
भारताकडून खेळणं हे केवळ एक स्वप्न पूर्ण होण्यासारखं नव्हतं तर मोठ्या अभिमानाने पार पाडलेली जबाबदारी होती, असंही तिने नमूद केलंय. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील या प्रवासाचा शेवट करताना तिच्या मनात कृतज्ञतेची भावना असल्याचं तिने सांगितलंय. तिच्यावर विश्वास ठेवणाऱ्या, तिला साथ देणाऱ्या आणि या प्रवासाचा भाग बनलेल्या सर्वांचे पूनमने आभार मानलेत.
पूनम राऊतने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत भारताकडून एकूण ४ कसोटी, ७३ एकदिवसीय आणि ३५ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले.
टेस्ट क्रिकेट- पूनमने ४ कसोटी सामने खेळले आणि यामध्ये ७ डावांत तिने २६४ रन्स केलेत.
वनडे क्रिकेट- ७३ वनडे सामन्यांतील ७३ डावांत तिने एकूण २,२९९ रन्स केलेत.
टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेट- ३५ सामन्यांत तिने ३१ डाव खेळले आणि ७१९ रन्स केलेत.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दहा वर्षांहून अधिक काळ भारताचं प्रतिनिधित्व केल्यानंतर पूनमने आता तिच्या क्रिकेट कारकिर्दीचा हा अध्याय संपवलाय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.