पश्चिम बंगाल पोलिसांच्या स्पेशल टास्क फोर्स (STF) ने पाकिस्तानशी संबंधित मोठ्या कटाचा पर्दाफाश केला आहे. या कटामध्ये राज्याचे मुख्यमंत्री सूवेंदु अधिकारी यांना लक्ष्य करण्याची योजना, हावडा येथील एका वरिष्ठ राजकारण्याच्या मुलाला हनीट्रॅपमध्ये अडकवण्याचा प्रयत्न, तसेच दिल्लीतील जंतरमंतरवरील नीट पेपरफुटी विरोधात विद्यार्थी आंदोलनात गोंधळ निर्माण करण्याचा डाव असल्याचे समोर आले आहे. ही माहिती हमीम मोंडल या संशयित जैश-ए-मोहम्मदशी संबंधित कार्यकर्त्याच्या अटकेनंतर समोर आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्याची जवळची सहकारी आणि मैत्रीण अर्पिता सरकार हिलाही झारखंडमधील साहिबगंज येथून अटक करण्यात आली असून तिला पश्चिम बंगालमधील बर्दवान येथे आणण्यात आले आहे.
STF ला सुरुवातीला हावडा येथील एका वरिष्ठ राजकारण्याला खंडणीसाठी लक्ष्य करण्याचा आणि त्यांच्या मुलाला हनीट्रॅपद्वारे अपहरण करण्याचा कट असल्याची माहिती मिळाली. तपासादरम्यान ‘अर्पिता सरकार’ या नावाने चालवले जाणारे संशयास्पद ऑनलाइन हँडल आढळले. पोलिसांनी तिच्या हालचालींवर लक्ष ठेवत जो व्यक्ति टार्गेटवर होता त्याला सतर्क करून सुरक्षा वाढवली. याच दरम्यान अर्पिता सरकार आणि हमीम मोंडल यांच्यात घनिष्ठ संपर्क असल्याचे उघड झाले. मोंडल पूर्वी हावड्यातील पिलखाना येथे राहत होता, मात्र अलीकडे तो बर्दवान येथे स्थलांतरित झाला होता. 31 जुलैच्या रात्री त्याला बर्दवानमधील रेनिसाँस रेसिडेन्सी येथून अटक करण्यात आली.
चौकशीतून मोंडल ‘राणा’, ‘उजैर’ आणि ‘अबीर जाट 333’ या नावांनी चालणाऱ्या अनेक ऑनलाइन हँडल्सशी संपर्कात असल्याचे उघड झाले. सुरुवातीला इंस्टाग्रामवर सुरू झालेला हा संपर्क नंतर व्हॉट्सअॅप आणि टेलिग्राम, सेशन, एलिमेंट एक्स यांसारख्या एन्क्रिप्टेड प्लॅटफॉर्मवर गेला. हे हँडल्स पाकिस्तानमधून चालवले जात असल्याचा संशय असून त्यांचा संबंध शाहजाद भट्टी गँगशी असल्याचे STF चे म्हणणे आहे. तपासात या नेटवर्ककडून तरुणांना भडकवणे, कट्टर विचारसरणीचा प्रचार करणे आणि त्यांना देशविरोधी कारवायांसाठी तयार करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे समोर आले.
STF च्या मते, या कटाचा एक भाग म्हणून मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांच्या हालचालींचा अभ्यास करून त्यांच्यावर हल्ला करण्याची योजना आखली जात होती. तसेच दिल्लीतील जंतरमंतर येथे झालेल्या विद्यार्थी आंदोलनात गोंधळ घालण्यासाठी मोंडलला पोलिसांचा गणवेश मिळवण्याचे निर्देश देण्यात आले होते.
पोलिसांच्या म्हणण्यानुसार, पाकिस्तानी हँडलर्सनी हमीम मोंडलला पोलिसांचा वेश परिधान करून आंदोलनात शिरकाव करून विध्वंसक कारवाई करण्याचे सांगितले होते. तपासात असेही समोर आले की, मोंडलने हावड्यातील एका वरिष्ठ मंत्र्याच्या मुलाला लक्ष्य करून अर्पिता सरकारच्या माध्यमातून हनीट्रॅप रचण्याचा प्रयत्न केला होता. अर्पिता आणि मोंडल यांची ओळख चार वर्षांपूर्वी इंस्टाग्रामवर झाली होती आणि नंतर त्यांचे संबंध अधिक घट्ट झाले. STF सध्या अर्पिताच्या परदेशी हँडल्सशी असलेल्या संपर्काचा आणि संभाव्य आर्थिक व्यवहारांचा तपास करत आहे. बँक खात्यांची तपासणी करून पाकिस्तानमधून निधी मिळाल्याचा कोणताही पुरावा शोधण्याचे काम सुरू आहे. दरम्यान, पोलिसांनी स्पष्ट केले की हमीम मोंडलचा संपूर्ण पार्श्वभूमी तपास अद्याप सुरू असून अंतिम निष्कर्ष काढलेले नाहीत. पुढील तपासानंतर अधिक माहिती समोर येणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.