उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचा राजीनामा: राजकीय वर्तुळात खळबळ
पावसाळी अधिवेशनात राज्यसभेचे सभापतीपद कोण सांभाळणार?
प्रकृतीच्या कारणामुळे धनखड यांचा राजीनामा: नवीन उपराष्ट्रपतींची निवड कधी?
संविधानानुसार उपसभापती हरिवंश नारायण सिंह सांभाळणार राज्यसभेची जबाबदारी
Vice President Jagdeep Dhankhar Resigns News Update : संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी राजीनामा दिला. प्रकृतीच्या कारणास्तव डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार राजीनामा देत असल्याचे पत्र धनखड यांनी पाठवलं. विशेष म्हणजे सोमवारी सकाळपर्यंत धनखड राज्यसभेचे सभापती म्हणून कामकाज पाहत होते. ७४ वर्षांच्या जगदीप धनखड यांच्या राजीनाम्यानंतर उपराष्ट्रपती म्हणून कुणाची नियुक्ती होणार? राज्यसभेचे सभापती, अध्यक्ष म्हणून कोण काम पाहाणार? याबाबत केंद्रीय राजकारणात जोरदार चर्चा सुरू झाली.
जगदीप धनखड यांचे वय ७४ असून मार्च २०२५ मध्ये हृदयाशी संबंधित आजाराने AIIMS मध्ये दाखल झाले होते. प्रकृतीच्या कारणामुळेच धनखड यांनी राजीनामा दिल्याची चर्चा आहे. पण पावसाळी अधिवेशन सुरू झाल्यानंतर पहिल्याच दिवशी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या अचानक राजीनाम्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. आता राज्यसभेच्या पावसाळी अधिवेशनाचे अध्यक्षपद कोण सांभाळणार? संविधानानुसार, भारताचे उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे सभापती असतात. म्हणजेच उपराष्ट्रपतींनी राजीनामा दिल्याबरोबर राज्यसभेचे सभापतीपद रिक्त झाले आहे. पावसाळी अधिवेशनाला सुरूवात झाली आहे, त्यातच उपराष्ट्रपतींनी राजीनामा दिला, त्यामुळे पर्यायी व्यवस्था करणे आवश्यक आहे. आता ही जागा कोण घेणार? यासंदर्भात काय नियम आहेत? याबाबत जाणून घेऊयात..
संसदेच्या नियमांनुसार, सभापती उपस्थित नसल्यास राज्यसभेचे अधिवेशन उपसभापतींच्या अध्यक्षतेखाली होऊ शकते. सध्या राज्यसभेचे उपसभापती हरिवंश नारायण सिंह आहेत. ते २०२० पासून या पदावर कार्यरत आहेत. म्हणजेच जोपर्यंत नवीन उपराष्ट्रपतींची निवड होत नाही आणि ते पदभार स्वीकारत नाहीत, तोपर्यंत हरिवंश नारायण सिंह राज्यसभेच्या कार्यवाहीचे कामकाज पाहतील.
नवीन उपराष्ट्रपतींची निवड संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या निवडून आलेल्या सदस्यांकडून होते. ही निवड गुप्त मतदानाद्वारे केली जाते. उपराष्ट्रपतींची निवड होईपर्यंत उपसभापतींची जबाबदारी अत्यंत महत्त्वाची मानली जाईल. पावसाळी अधिवेशनात अनेक महत्त्वाची विधेयके आणि चर्चेची तयारी आहे, त्यामुळे सभापतींची भूमिका अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
संविधानाच्या कलम ६४ आणि ८९ राज्यसभेच्या अध्यक्षतेशी संबंधित तरतुदी स्पष्टपणे सांगतात. कलम ८९(१) नुसार, राज्यसभेसाठी एक उपसभापती नेमला जातो. तो सभापतींच्या अनुपस्थितीत सर्व कामकाजाची देखरेख करतो. त्यामुळे आता जगदीप धनखड यांनी राजीनामा दिल्यानंतर हरिवंश नारायण सिंह ही जबाबदारी सांभाळतील.
होय, याआधी २०१७ मध्ये उपराष्ट्रपती हामिद अन्सारी यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यावर आणि निवडणुकीपूर्वी काही दिवसांसाठी सभापतींची जबाबदारी उपसभापतींकडे होती. त्यामुळे अशी स्थिती पहिल्यांदाच उद्भवलेली नाही. पण संसदेचे पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी उपराष्ट्रपतींचा राजीनामा मोठी राजकीय घडामोड मानली जात आहे. जगदीप धनखड यांनी प्रकृतीच्या कारणामुळे राजीनामा दिला आहे. पण केंद्राच्या राजकारणात याबाबत वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत.
जगदीप धनखड यांनी उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा का दिला?
प्रकृतीच्या कारणास्तव, डॉक्टरांच्या सल्ल्याने धनखड यांनी राजीनामा दिला.
जगदीप धनखड यांच्या राजीनाम्याने राज्यसभेच्या पावसाळी अधिवेशनावर काय परिणाम होईल?
धनखड यांच्या राजीनाम्याने सभापतीपद रिक्त झाले असले, तरी उपसभापती हरिवंश नारायण सिंह अधिवेशनाचे कामकाज पाहतील, त्यामुळे अधिवेशनात कोणताही मोठा अडथळा येणार नाही.
राज्यसभेचे सभापतीपद रिक्त झाल्यावर आता कोण कामकाज पाहणार?
उपसभापती हरिवंश नारायण सिंह सध्या राज्यसभेचे कामकाज पाहतील.
नवीन उपराष्ट्रपतींची निवड कशी होते?
संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या निवडून आलेल्या सदस्यांकडून गुप्त मतदानाद्वारे उपराष्ट्रपतींची निवड होते.
संविधानात सभापतींच्या अनुपस्थितीत कोणत्या तरतुदी आहेत?
कलम ८९(१) नुसार, उपसभापती सभापतींच्या अनुपस्थितीत राज्यसभेचे कामकाज सांभाळतात.
यापूर्वी अशी परिस्थिती कधी उद्भवली आहे का?
होय, 2017 मध्ये हामिद अन्सारी यांचा कार्यकाळ संपल्यानंतर काही काळ उपसभापतींनी सभापतींची जबाबदारी सांभाळली होती.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.