उत्तर प्रदेशच्या अलिगडमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. शिक्षिकेने क्रूरतेचा अक्षरश: कळस गाठला आहे. यूकेजीच्या वर्गात शिकणाऱ्या 7 वर्षाच्या मुलाने बॅग घरीच विसरल्यामुळे शिक्षिकेने त्याला खूपच भयंकर शिक्षा दिली. या शिक्षिकेने आधी या विद्यार्थ्याला मारहाण केली. त्यानंतर कपडे काढून त्याला खुर्चीवर बसवून करंट दिला. या घटनेमुळे उत्तर प्रदेशमध्ये खळबळ उडाली आहे. या शिक्षिकेला कठोर शिक्षा द्यावी अशी मागणी केली जात आहे.
शाळा सुटल्यानंतर चिमुकला रडत रडत घरी गेला आणि त्रास होत असल्याचे सांगितले. तसंच यापुढे मी शाळेत जाणार नसल्याचे देखील त्याने आईला सांगितले. त्याच्या आईने त्याला शाळेत न जाण्यामागचे कारण विचारले तर या मुलाने त्याच्यासोबत शिक्षिकेने केलेले कृत्य सांगितले. हे ऐकून त्याच्या आई-वडिलांना मोठा धक्का बसला. त्यानंतर मुलाच्या आई-वडिलांनी पोलिस ठाण्यात धाव घेत याप्रकरणी तक्रार दाखल केली. या घटनेचा धक्कादायक सीसीटीव्ही व्हिडीओ देखील समोर आला आहे. सध्या पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून याचा तपास सुरू केला आहे.
लोधा पोलिस स्टेशन हद्दीतील भरत नागला गावातील रहिवासी दिलीप कुमार यांनी सांगितले की, त्यांचा मुलगा जेम्स खेरेश्वर धाम मंदिराजवळील एका खासगी शाळेत यूकेजीचा विद्यार्थी आहे. घटनेच्या दिवशी दिलीप शहराबाहेर होते आणि मुलाची आई आजारी होती. त्यामुळे मुलाच्या आजोबांनी त्याला शाळेत सोडले होते. मुलाच्या कुटुंबीयांनी आरोप केला आहे की, मुलगा शाळेची बॅग घरी विसरल्याचा राग आल्यामुळे शिक्षकाने त्याला बेदम मारहाण केली. यानंतर त्याचे कपडे आणि बूट काढून त्याला इलेक्ट्रिक करंट दिले.
मुलाच्या कुटुंबीयांनी तात्काळ शाळेत जाऊन याचा जाब विचारला आणि पोलिसांना घटनेची माहिती दिली. चिमुकल्याच्या पालकांनी दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास सुरू केला. तक्रारीनंतर लोधा पोलिस स्टेशनचे प्रभारी राजवीर सिंह परमार आणि त्यांची टीम शाळेत पोहोचली आणि त्यांनी तपास सुरू केला.
'आम्ही शाळेतील कर्मचारी आणि प्रशासकांची चौकशी सुरू केली आहे. दोषींवर गुन्हा दाखल केला जाईल.',' असे डीएसपी रंजन शर्मा यांनी सांगितले. पण शाळेच्या मुख्याध्यापकांनी आरोप चुकीचे असल्याचे सांगितले. आरोप फेटाळून लावत शाळेच्या मुख्याध्यापकाने सांगितले की,'मुलाला इलेक्ट्रिक करंट दिल्याच्या तक्रारी खोट्या आहेत. आम्ही सीसीटीव्ही फुटेज दाखवण्यास तयार आहोत. सर्व आरोप चुकीचे आहेत.'
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.