गाझियाबादमध्ये मोठा दहशतवादी कट उधळला
ISI साठी काम करणारी दहशतवादी टोळी पकडली
२०२६ मध्ये साखळी बॉम्बस्फोटाचा कट
७ राज्यांमध्ये हल्ल्यांचे नियोजन
उत्तर प्रदेशातील गाझियाबाद जिल्ह्यातील पोलिसांनी सात राज्यांमध्ये दहशतवादी हल्ले करण्याचा कट उधळून लावला आहे. दहशतवादी टोळीच्या नऊ सदस्यांना अटक करण्यात आली असून, त्यात पाच अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. आतापर्यंत या टोळीच्या १५ सदस्यांना अटक करण्यात आली आहे. अटक केलेल्या सहा हेरांनी दिलेल्या माहितीच्या आधारे उर्वरित नऊ जणांना अटक करण्यात आली. ही टोळी भारतात पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयसाठी काम करत असल्याचं चौकशीदरम्यान उघड झालं.
मिळालेल्या माहितीनुसार, गाझियाबाद पोलिसांनी अल्पवयीन आरोपींना बालसुधारगृहात पाठवले आहे. आरोपींपैकी एक नववी इयत्तेत शिकत असून आरोपींचे वय १५ ते १७ वर्षांच्या दरम्यान आहे. आरोपींकडून नऊ मोबाईल फोन आणि १० सिम कार्डही जप्त करण्यात आले आहेत. आरोपींनी एक पाकिस्तानी, एक मलेशियन आणि एक ब्रिटिश नंबर वापरला होता. ही मुलं हेरगिरी करून लष्करी तळ, अदानी आणि अंबानींसारख्या श्रीमंत व्यक्तींची घरे आणि संवेदनशील ठिकाणांची माहिती, फोटो आणि व्हिडिओ पाकिस्तानातील त्यांच्या वरिष्ठांना पाठवत होते.
गाझियाबाद पोलिसांच्या माहितीनुसार, अटक केलेल्या टोळीच्या सदस्यांच्या चौकशीतून असे उघड झाले आहे की, ते देशभरातील अनेक राज्यांमध्ये साखळी बॉम्बस्फोट घडवून दहशतवादी हल्ल्यांचा कट रचत होते. हा कट दोन वर्षांपूर्वी रचण्यात आला होता आणि तो २०२६ मध्ये अमलात आणला जाणार होता. गुप्तचर यंत्रणांनी म्हटले आहे की, जम्मू आणि काश्मीर, दिल्ली, मुंबई, पंजाब, हरियाणा, राजस्थान आणि उत्तर प्रदेशमध्ये हल्ल्यांचे नियोजन करण्यात आले होते.
देशविरोधी कारवाया करताना पंजाबमध्ये पकडलेल्या सुहेलने पोलिसांना या टोळीची आणि त्यांच्या षडयंत्रांची माहिती दिली.सुहेलच्या खुलाशांनंतर पंजाबमध्ये सुरक्षा वाढवण्यात आली आहे. आरोपींवर यूएपीए अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची तयारी सुरू आहे. सुहेल मलिक उर्फ रोमियोने सांगितले की, दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या बॉम्बस्फोटानंतर जालंधर हे पुढचे लक्ष्य होते. मात्र, स्लीपर सेल पकडल्यामुळे हे लक्ष्य टाळण्यात आले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.