उत्तर प्रदेशातील कुशीनगर जिल्ह्यात व्हॅन आणि ट्रेलरचा भीषण अपघात
या दुर्घटनेत सात जणांचा जागीच मृत्यू, तर दोन जण गंभीर जखमी.
मृतांमध्ये एकाच कुटुंबातील पाच जणांचा समावेश असल्याची माहिती.
उत्तर प्रदेशातील कुशीनगर जिल्ह्यात रविवारी रात्री भीषण अपघात झाला. प्रवाशांनी भरलेल्या व्हॅनची समोरून येणाऱ्या ट्रेलरला जोरदार धडक बसली. या दुर्घटनेत सात जणांचा जागीच मृत्यू झाला, तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. मृतांमध्ये एकाच कुटुंबातील पाच जणांचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, कप्तानगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भलुही गावातील प्रधान प्रतिनिधी कन्हैया प्रसाद हे आपल्या कुटुंबीयांसह नातेवाईकांच्या घरी कार्यक्रमासाठी गेले होते. कार्यक्रम संपल्यानंतर रात्री उशिरा ते व्हॅनमधून घरी परतत होते. यावेळी हाटा कोतवाली परिसरातील थरुआडीह गावाजवळ त्यांच्या व्हॅनची समोरून येणाऱ्या ट्रेलरशी जोरदार धडक झाली.
अपघाताची तीव्रता इतकी जास्त होती की व्हॅनचा पूर्णपणे चक्काचूर झाला. त्यामध्ये प्रवासी अडकून पडले. धडकेचा आवाज ऐकून आसपासच्या परिसरातील नागरिक घटनास्थळी जमा झाले. त्यांनी पोलिसांच्या मदतीने व्हॅनमध्ये अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, या अपघातात सात जणांना जीव गमवावा लागला.
मृतांमध्ये कन्हैया प्रसाद, त्यांचे वडील रामबेलास, राम मिलन आणि आयुष यांच्यासह सात जणांचा समावेश आहे. जखमी झालेल्या दोघांना सुरुवातीला प्राथमिक उपचार देण्यात आले. त्यानंतर त्यांची प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारांसाठी गोरखपूर येथील वैद्यकीय महाविद्यालयात पाठवण्यात आले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह ताब्यात घेऊन पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. अपघातानंतर ट्रेलर चालक घटनास्थळावरून पळून गेला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. या दुर्घटनेची बातमी भलुही गावात पोहोचताच शोककळा पसरली. अपघात नेमका कशामुळे झाला, याचा तपास पोलीस करत आहेत.