Mens Mental Health : घराचा आधार असलेले पुरुष आतून का तुटतात? भावना लपवण्याचे तोटे नक्की वाचा

Mental Health Awareness : घराची जबाबदारी सांभाळताना अनेक पुरुष स्वत:च्या भावना आणि दु:ख मनातच दाबून ठेवतात.
Mens Mental Health
Mens Mental Healthsaam tv
Published On: 

घरातल असणारे वडील असो, नवरा असो किंवा भाऊ... प्रत्येकाच्या आयुष्यात असा एक पुरुष असतो, जो स्वतःच्या इच्छा बाजूला ठेवून कुटुंबाच्या आनंदासाठी सतत धडपडत असतो. घरातल्या प्रत्येकाची काळजी घेणारा हा माणूस स्वतः मात्र थकला आहे का, त्याच्या मनात काय सुरू आहे, त्याला कशाचं टेन्शन आहे, हे विचारायला बऱ्याचदा कुणालाच वेळ नसतो.

महिन्याचा पगार आला की घरखर्च, मुलांची फी, आई-वडिलांची औषधं, कर्जाचे हप्ते आणि भविष्याचं टेन्शन अशा सगळ्या गोष्टींचा हिशोब करताना पुरुष स्वतःच्या स्वप्नांचा हिशोब करायचाच विसरून जातो. चेहऱ्यावर हसू ठेवून सगळ्यांना धीर देणारा हा पुरुष रात्री उशिरा एकटाच बसून कधी मनातल्या मनात रडत असेल, याची कल्पनाही कुटुंबाला नसते.

Mens Mental Health
Gold Price Today : सोन्याच्या दरात मोठी घसरण! आठवडाभरात 10 टक्क्यांनी भाव कोसळले; आणखी स्वस्त होणार का?

लहानपणापासून मुलांच्या मनावर एक गोष्ट बिंबवली जाते, ती म्हणजे, 'मुलं रडत नाहीत', 'मर्द को दर्द नहीं होता', पुरुषाने नेहमी खंबीर असलं पाहिजे. याच शिकवणीमुळे बरेच पुरुष आपलं दु:ख, भीती, टेन्शन आणि मानसिक त्रास कोणासमोर व्यक्त करत नाहीत. पण भावना लपवणं ही खंबीरपणाची निशाणी नसून त्याचा मानसिक आरोग्यावर परिणाम होऊ शकतो.

Mens Mental Health
8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगात मोठा धमाका! ६% इन्क्रिमेंटसह जुनी पेन्शनही मिळणार?

भावना दाबून ठेवल्याने वाढू शकतो मानसिक ताण

कुटुंबाची जबाबदारी, नोकरीतील स्पर्धा, आर्थिक अडचणी आणि नात्यांमधील तणाव यांचा पुरुषांवरही मानसिक परिणाम होतो. मात्र, अनेकजण मनातील गोष्टी बोलून दाखवण्याऐवजी शांत राहणं पसंत करतात.

मन मोकळं केल्याने मिळू शकतो दिलासा

अंबाला शहरातील नागरिक रुग्णालयात कार्यरत होमिओपॅथिक डॉक्टर डॉ. रजिता यांच्या माहितीनुसार, पुरुषांनाही दुःख होतं, त्यांनाही मानसिक आणि कौटुंबिक समस्या असतात. मात्र, अनेकदा ते आपल्या भावना व्यक्त करू शकत नाहीत. मनातल्या गोष्टी विश्वासू व्यक्तीशी शेअर केल्याने मानसिक ताण कमी होण्यास मदत मिळू शकते.

मानसिक तणा‌वाचा शरीरावरही होतो परिणाम

सतत तणावात राहिल्याने झोप न लागणे, थकवा, चिडचिड, रक्तदाब वाढणे अशा समस्या उद्भवू शकतात. दीर्घकाळ तणाव राहिल्यास हृदयाच्या आरोग्यावरही परिणाम होण्याची शक्यता असते. त्यामुळे मानसिक त्रासाकडे दुर्लक्ष करणं योग्य नाही.

दुःख विसरण्यासाठी व्यसनाचा आधार घेऊ नका

काही पुरुष मनातील वेदना विसरण्यासाठी दारू किंवा इतर व्यसनांचा आधार घेतात. त्याने समस्या सुटण्याऐवजी जास्त गंभीर होऊ शकतात. पत्नी, आई-वडील, मित्र किंवा जवळच्या व्यक्तींशी मनमोकळा संवाद साधणं जास्त महत्त्वाचं आहे.

शेवटी एक गोष्ट लक्षात ठेवा…

घरासाठी दिवसरात्र झटणाऱ्या पुरुषालाही कधी तरी आधाराची गरज असते. त्यालाही कुणीतरी 'तू ठीक आहेस ना?', 'काही अडचण आहे का?' असं विचारावं, असं वाटत असतं. पुरुष म्हणजे भावनाहीन माणूस नाही. त्यालाही रडण्याचा, थकण्याचा आणि मदत मागण्याचा पूर्ण अधिकार असतो. कारण घराचा आधार असणाऱ्या माणसालाही कधी तरी कुणाच्या तरी खांद्याची गरज असते. त्याच्या चेहऱ्यावरील हसू पाहून तो आनंदी आहे, असा समज करून घेऊ नका… कधी तरी त्याच्या मनाचीही विचारपूस करा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.