राजस्थानमधील विधानसभा निवडणुकांची तयारी पूर्ण झाली आहे. सोमवारी विधानसभेच्या २०० जागांसाठी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्यासह १५७९ उमेदवारांनी अर्ज दाखल केला. अशोक गहलोत जोधपूरच्या सरदारपुरा विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरत आहेत. सरदारपुरा मतदारसंघ गहलोत यांचा पारंपरिक मतदारसंघ मानला जोतो.
अशोक गहलोत यांनी अर्ज दाखल करताना निवडणूक आयोगाला दिलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांच्या संपत्तीचाही खुलासा झाला. निवडणूक आयोगाला दिलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांची १. ९५ कोटीची जंगम मालमत्ता असल्याचे म्हटले आहे. यात बँक खात्यामध्ये जमा केलेल्या १.९३ कोटी रुपयांचा समावेश आहे. तसेच त्यांच्याकडे २० रुपयांची रोख रक्कम, तर पत्नीकडे १० हजार रुपयांची रोख रक्कम असल्याचे म्हटले आहे.
२०२२ -२३ या आर्थिक वर्षाच अशोक गहलोत यांचे २५ लाख ७४ हजार ८०० रुपये वार्षिक उत्पन्न होते. तर २०१८-१९ मध्ये २० लाख ८८ हजार ९१० रुपयांचे उत्पन्न होते. यामध्ये त्यांचा पगार, बँक ठेवींवरील व्याज आणि घरभाडे याचा समावेश आहे. गहलोत यांच्या प्रतिज्ञापत्रानुसार त्यांची ८. ३२ कोटींची स्थावर मालमत्ता आहे.
दरम्यान अर्ज भरण्याच्या अंतिम दिवशी गहलोत यांच्यासह १५७९ उमेदवारांनी अर्ज दाखल केला आहे. यामध्ये संसदीय कामकाज मंत्री शांती धारिवाल, अल्पसंख्याक मंत्री शाले मोहम्मद, ओसियाच्या आमदार दिव्या मदेरणा यांच्यासह कर्नल सोनाराम चौधरी, क्रीडामंत्री अशोक चंदना यांच्या नावांचा समावेश आहे. अर्ज दाखल करताना सर्व उमेदवारांनी निवडणुकीत आपलाच विजय होईल असा विश्वास व्यक्त केला.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
सोमवारी भाजपच्या अनेक दिग्गज नेत्यांनीही अर्ज दाखल केले. ज्यामध्ये माजी आमदार प्रल्हाद गुंजाळ, प्राध्यापक महेंद्र सिंह राठोड, गिरराज मलिंगा, उपेन यादव यांच्या नावाचाही समावेश आहे. भाजप आणि कॉंग्रेसमध्ये बंडखोरी केलेल्या नेत्यांनीही अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केले.
विधानसभेच्या २०० जागांसाठी २५ नोव्हेंबरला मतदान होणार आहे. तर ३ डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. राजस्थानमध्ये यावेळी ५ कोटी २६ लाख ८० हजार ५४५ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. या निवडणुकीत कॉंग्रेस आणि भाजप यांच्यात थेट लढत होणार असून दोन्ही पक्षांकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.