कोरोना महामारीच्या (Corona) काळामध्ये नागरिकांना कोरोनावरील लस (Covid-19 Vaccine) दिली जात होती. ही लस दिल्यानंतर नागरिकांना कोविड लसीकरण प्रमाणपत्र दिले जात होते. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाकडून प्रमाणपत्र जारी करण्यात आले होते. या प्रमाणपत्रावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो होता. या प्रमाणपत्रावर पीएम मोदींच्या (PM Narendra Modi) फोटोसोबत 'Together, India will defeat COVID-19' असे कॅप्शन लिहिले होते. पण आता या प्रमाणपत्रावरील मोदींचा फोटो गायब झाला आहे. हा फोटो काढून टाकण्यात आला असल्याची माहिती समोर आली आहे. हा फोटो का काढून टाकण्यात आला आहे हे आपण जाणून घेणार आहोत...
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर युजर संदीप मनुधने यांनी त्याचा कोविड लस प्रमाणपत्राचा फोटो शेअर केला . हा फोटो शेअर करत त्यांनी सांगितले की, त्यावरून पंतप्रधानांचा फोटो काढून टाकण्यात आला आहे. त्यांनी लिहिले, 'कोविड लस प्रमाणपत्रावर मोदीजी आता दिसत नाहीत. ते तपासण्यासाठी मी आता कोविड लसीचे प्रमाणपत्र डाउनलोड केले. त्यावरून मोदींचा फोटो गायब झाला आहे.' आता अशा परिस्थितीत प्रश्न येतो की कोविड प्रमाणपत्रावरून पंतप्रधान मोदींचा फोटो का काढला गेला?
द प्रिंटच्या वृत्तानुसार, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, लोकसभा निवडणुकीसाठी आदर्श आचारसंहिता लागू असल्यामुळे लसीकरण प्रमाणपत्रातून पीएम मोदींचा फोटो काढून टाकण्यात आला आहे.' संदीप मनुधने यांनीही आपल्या ट्विटमध्ये असेच म्हटले आहे. लोकसभा निवडणुकीसाठी दोन टप्प्यात मतदान झाले आहे. सध्या आदर्श आचारसंहिता लागू आहे. ती निवडणूक संपल्यानंतरच पीएम मोदींचा फोटो कोविड लसीकरण प्रमाणपत्रावर दिसेल.
कोविड लसीकरण प्रमाणपत्रावरून पंतप्रधान मोदींचा फोटो काढून टाकण्याची ही पहिलीच वेळ नाही. 2022 मध्ये गोवा, मणिपूर, उत्तराखंड, पंजाब आणि उत्तर प्रदेशसह अनेक राज्यांमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये देखील पंतप्रधानांचा फोटो कोविड लसीकरण प्रमाणपत्रावरून काढून टाकण्यात आला होता. तसे करण्याचे निर्देश निवडणूक आयोगाने दिले होते.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.