Parliament Monsoon Session 2023 no confidence motion : मणिपूरमधील हिंसाचाराच्या घटनांवरून विरोधी पक्ष आक्रमक झाले आहेत. केंद्रातील मोदी सरकारवर सडकून टीका केली जात आहे. काँग्रेससह सर्वच विरोधी पक्षांकडून संसदेच्या सभागृहात पंतप्रधान मोदींनी मणिपूरच्या घटनेवर बोलावं, अशी मागणी केली जात आहे. संसदेच्या पावसाळी अधिवेशनात विरोधक सरकारच्या विरोधात या मुद्द्यावरून अविश्वास प्रस्ताव आणण्याच्या तयारीत आहेत. त्याचदरम्यान सोशल मीडियावर पंतप्रधान मोदींचा ४ वर्षांपूर्वीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्यात त्यांनी २०२३ मध्ये अविश्वास प्रस्ताव आणण्यात येईल, अशी भविष्यवाणी केली होती. (Latest Marathi News)
सन २०१८ मध्ये शेतकऱ्यांच्या संबंधित विधेयकावरून मोदी सरकारच्या पहिल्या कार्यकाळात विरोधकांकडून संसदेच्या सभागृहात अविश्वास प्रस्ताव आणण्यात आला होता. त्यावेळी सभागृहात त्यावर जवळपास ११ तास चर्चा झाली होती. चर्चेनंतर मतदानही झाले होते. त्यात विरोधकांच्या बाजूने कमी मतदान झाले होते. अविश्वास प्रस्तावाच्या समर्थनार्थ १२६ आणि विरोधात ३२५ मते पडली होती. मोदी सरकारने हा अविश्वास प्रस्ताव जिंकला होता.
अविश्वास प्रस्तावावर पंतप्रधान मोदींनी सन २०१९ मध्ये भविष्यवाणी केली होती. विरोधकांनी २०२३ मध्ये सरकारविरोधात पुन्हा अविश्वास प्रस्ताव आणण्याचा प्रयत्न करावा. भाजपकडून तो व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. तो लोकसभा निवडणूक २०१९ पूर्वीचा आहे. त्यात पंतप्रधान मोदींनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला.
मोदींनी अविश्वास प्रस्तावाबाबत भविष्यवाणी करताना विरोधकांवर निशाणा साधला होता. मी तुम्हाला शुभेच्छा देतो. २०२३ मध्ये पुन्हा अविश्वास प्रस्ताव आणावा लागेल अशी तयारी करा, असे मोदी म्हणाले होते. त्यावर मल्लिकार्जुन खरगेंनीही टीकास्त्र सोडलं होतं.
हा अहंकार आहे, असे ते म्हणाले होते. त्यावर मोदींनी जोरदार प्रत्युत्तर दिले होते. हा आमचा समर्पण भाव आहे. अहंकारामुळं तुम्ही ४०० वरून ४० वर आलात. आमची सेवाभावी वृत्ती आहे. त्यामुळे आम्ही दोनवरून इथपर्यंत पोहोचलो आहोत, असे मोदी म्हणाले होते.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.