संसदेच्या आगामी अधिवेशनाची तयारी केंद्र सरकारने सुरू केलीये. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत सर्व मंत्र्यांना महत्त्वाच्या सूचना दिल्या. 15 डिसेंबरपूर्वी संसदेच्या अधिवेशनाची तयारी पूर्ण करा तसंच या काळात परदेश दौरे टाळा, असं त्यांनी मंत्र्यांना सांगितलंय. प्रत्येक मंत्र्याने आपापल्या मंत्रालयाची अधिवेशनासाठी तयारी ठेवावी, असेही निर्देश त्यांनी दिलेत.
आगामी अधिवेशनात मतदारसंघांची पुनर्रचना म्हणजेच परिसीमन आणि महिला आरक्षणाशी संबंधित संविधान दुरुस्ती विधेयकावर सरकार पुढे जाण्याची शक्यता आहे. पण संसदेचे अधिवेशन नेमके कधी सुरू होणार आणि किती दिवस चालणार याचा अंतिम निर्णय संसदीय कामकाजविषयक मंत्रिमंडळ समिती घेणार आहे.
पीटीआय वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार, बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत आगामी संसदेच्या अधिवेशनाबाबत चर्चा झाली. याशिवाय हिवाळी अधिवेशन बोलावण्यास होत असलेल्या विलंबावरून विरोधक सातत्याने सरकारला प्रश्न विचारतायत.
बुधवारी रात्रीपर्यंत पावसाळी अधिवेशन स्थगित केल्याची अधिकृत घोषणा करण्यात आली नव्हती. संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज 13 ऑगस्ट रोजी अनिश्चित काळासाठी तहकूब करण्यात आलं होतं. त्यानंतर आता 100 दिवसांपेक्षा जास्त काळ झाला आहे.
अधिवेशनाच्या तारखा जाहीर न झाल्यामुळे विशेष अधिवेशन बोलावलं जाण्याची शक्यताही व्यक्त केली जातेय. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघांची पुनर्रचना करण्याच्या प्रस्तावामुळे या चर्चेला अधिक महत्त्व आले आहे.
आगामी अधिवेशनात संविधान (131 वी दुरुस्ती) विधेयक, 2026 मांडलं जाण्याची शक्यता आहे. या विधेयकाचा संबंध परिसीमन आणि महिला आरक्षणाशी आहे. याआधी 17 एप्रिल रोजी झालेल्या संसदेच्या विशेष अधिवेशनात आवश्यक पाठिंबा न मिळाल्यामुळे हे विधेयक मंजूर होऊ शकलं नव्हतं.
हे विधेयक लोकसभेत मंजूर करण्यासाठी दोन तृतीयांश खासदारांचा पाठिंबा आवश्यक आहे. म्हणजेच 361 खासदारांनी विधेयकाच्या बाजूने मतदान करणं गरजेचं आहे. लोकसभेची एकूण सदस्यसंख्या 543 आहे. पण तीन जागा रिक्त असल्यामुळे सध्या सभागृहात 540 खासदार आहेत.
सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडी म्हणजेच एनडीएकडे सध्या 320 खासदार आहेत. त्यामुळे विधेयक मंजूर करण्यासाठी सरकारला विरोधी पक्षांमधील काही खासदारांचाही पाठिंबा मिळवावा लागणार आहे.
दरम्यान विरोधी पक्षांमधील 26 खासदार वेगळे झाल्यामुळे राजकीय समीकरण बदललं आहे. तृणमूल काँग्रेसच्या 20 बंडखोर खासदारांनी वेगळा गट तयार केला आहे. त्यांनी नॅशनलिस्ट सिटिझन्स पार्टी ऑफ इंडियामध्ये विलीन होण्याचा निर्णय घेतला असून एनडीएला पाठिंबा देण्याची भूमिका घेतलीये. त्याचप्रमाणे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील सहा खासदार एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत सामील झालेत.
या घडामोडींनंतरही सरकारला विधेयक मंजूर करण्यासाठी आणखी खासदारांचा पाठिंबा मिळवावा लागणार आहे. लोकसभेत 22 खासदार असलेल्या डीएमके आणि आठ खासदार असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) यांची भूमिका महत्त्वाची ठरू शकते.
संसदेचे अधिवेशन बोलावण्यास होत असलेल्या विलंबावरून काँग्रेसने केंद्र सरकारवर टीका केलीये. काँग्रेसचे प्रवक्ते जयराम रमेश यांनी याबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत. देशातील नागरिकांना आतापर्यंत हिवाळी अधिवेशन किंवा संभाव्य विशेष अधिवेशनाच्या तारखा समजायला हव्या होत्या, असं त्यांनी म्हटलंय.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह नेमकी कोणती रणनीती आखत आहेत, असा सवालही जयराम रमेश यांनी उपस्थित केला. लोकसभेत विधेयक मंजूर करण्यासाठी सरकार दोन तृतीयांश बहुमत मिळवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांनी केला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.