नंदनवन असलेलं जम्मू-काश्मीर पहलगाम हल्ल्याच्या घटनेमुळं क्षणात दुःखाच्या दरीत बुडालं. या दहशतवादी हल्ल्यानंतर अख्खा देश शोकसागरात बुडाला आहे. क्रूर दहशतवाद्यांविरोधात संतापाची लाट उसळली आहे. या हल्ल्यात देशानं निष्पाप २८ नागरिकांना गमावलं. तर दहशतवाद्यांच्या गोळीबारात अनेक लोक जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. या भयानक हल्ल्यातून आसामच्या श्रीभूमीतील एक कुटुंब बचावलं आहे. त्यातील देबाशीष भट्टाचार्य यांनी हल्ल्यावेळचा अंगावर काटा आणणारा प्रसंग सांगितला. तो सांगतानाही त्यांना शब्द फुटत नव्हते. ते थरथरत होते.
देबाशीष भट्टाचार्य हे आसामच्या विद्यापीठात बंगाली विभागात कार्यरत आहेत. त्यांची पत्नीही तिथेच नोकरी करते. पत्नी आणि मुलांसह देबाशीष हे काश्मीरमध्ये फिरायला गेले होते. ते पहलगाममध्ये पर्यटनासाठी गेले. तिथे असतानाच दहशतवादी हल्ला झाला. दहशतवाद्यांच्या गटानं बेछूट गोळीबार केला. हल्ला झाला त्यावेळी तिथे देबाशीष होते.
दहशतवाद्यांनी अचानक हल्ला केल्यानंतर देबाशीष आणि कुटुंब एका झाडाच्या मागे लपून राहिलं. त्यावेळी त्यांनी बाजूलाच असलेल्या काही लोकांना कलमा पढताना ऐकलं. देबाशीष देखील त्यांच्यात जाऊन मिसळले. त्यावेळी एक दहशतवादी त्यांच्याजवळ गेला. त्यानं त्यांच्याकडं बघितलं. तू काय करतोस, काय बडबडत आहे, अशी विचारणा केली. रामनामाचा जप करतोस का असंही विचारलं. त्यावेळी देबाशिष यांनी चातुर्य दाखवत जोरजोरात कलमा पढायला सुरुवात केली, असं त्यांनी स्वतःच एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितलं.
देबाशीष म्हणाले की, मी जोरजोरात कलमा पठण करायला लागलो. मला व्यवस्थितपणे ते पठण करता येत नव्हतं. तरीही मी जोरजोरात पठण करत होतो. त्यांनी स्पष्टपणे कलमा पठण करण्यास सांगितलं नाही. काही वेळानं तो दहशतवादी तिथून निघून गेला. त्यामुळंच मी वाचू शकलो.
दहशतवादी हल्ल्याचा थरारक प्रसंग सांगताना देबाशीष भट्टाचार्य भावुक झाले होते. दहशतवादी तिथून निघून गेल्यानंतर संधी साधून पत्नी आणि मुलाला घेऊन तिथून कसाबसा हॉटेल पोहोचलो. मी अजूनही जिवंत आहे, यावर माझा विश्वासच बसत नाही, असंही भट्टाचार्य म्हणाले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.