Delhi Politics New Ministers: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी राजीनामा देण्याची घोषणा केली आहे. केजरीवाल यांच्या या घोषणेने दिल्लीच्या राजकारणात मोठी उलथापालथ होणार असून नवा मुख्यमंत्री कोण असेल? याबाबत चर्चा रंगू लागल्या आहेत. अशातच आता राजधानी दिल्लीला फक्त नवीन मुख्यमंत्रीच नव्हेतर दोन नवीन मंत्रीही मिळणार असल्याची माहिती समोर आली आहे. आज मुख्यमंत्रिपदाबाबत होणाऱ्या चर्चेमध्ये याबाबतचा निर्णय घेतला जाणार आहे.
'आप'चे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांच्या राजीनाम्यानंतर दिल्लीचा पुढील मुख्यमंत्री कोण होणार? याबाबत जोरदार चर्चा रंगू लागल्या आहेत. यासंदर्भात आम आदमी पार्टीच्या राजकीय घडामोडी समितीची (पीएसी) बैठक आज संध्याकाळी 5.30 वाजता मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी होणार आहे. केजरीवाल यांचा राजीनामा आणि नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणेबाबत निर्माण झालेल्या परिस्थितीबाबत यावर चर्चा होणार आहे. अरविंद केजरीवाल, मनीष सिसोदिया, संजय सिंग, दुर्गेश पाठक, आतिशी, गोपाल राय, इम्रान हुसैन, राघव चढ्ढा, राखी बिडलान, पंकज गुप्ता आणि एनडी गुप्ता हे त्याचे सदस्य आहेत.
महत्वाचे म्हणजे आज संध्याकाळी होणाऱ्या आम आदमी पक्षाच्या महत्वाच्या बैठकीत फक्त नव्या मुख्यमंत्र्यांचे नावच नाही तर दोन नव्या मंत्र्यांचीही नावे निश्चित केली जाणार आहेत. दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत अतिशी यांचे नाव सर्वाधिक चर्चेत आहे. त्यामुळे आतिशी मुख्यमंत्री झाल्यास मंत्रिमंडळात दोन मंत्रिपदे रिक्त होतील. आतिशी यांचे एक पद रिक्त होणार असून दुसरे पद राजकुमार आनंद यांच्या राजीनाम्यानंतरही रिक्त आहे. त्यामुळे नवीन आमदारांना मंत्रिमंडळात संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अनेक मंत्र्यांच्या खात्यांमध्ये फेरबदल होऊ शकतात, असेही बोलले जात आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या राजीनाम्याच्या घोषणेनंतर त्यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल मुख्यमंत्री होऊ शकतात अशी शक्यता वर्तवली जात आहे. त्याचबरोबर अरविंद केजरीवाल यांच्या सरकारमधील अनेक खाती सांभाळणाऱ्या मंत्री आतिशी यांच्या नावाची घोषणा केली जाऊ शकते, असा दावाही केला जात आहे. तसेच सौरभ भारद्वाज आणि मंत्री कैलाश गेहलोत हेही मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.