मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी आणि मतदार याद्यांची विशेष सखोल पुनर्तपासणी (SIR) रद्द करण्याच्या मागणीसाठी काँग्रेस आणि विरोधी पक्षांच्या नेत्यांनी नवी दिल्लीतील आकाशवाणी भवन परिसरात आंदोलन केलं. तब्बल आठ ते नऊ तास हे आंदोलन सुरू होतं. त्यानंतर दिल्ली पोलिसांनी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, प्रियांका गांधी यांच्यासह अनेक काँग्रेस नेते आणि समर्थकांना ताब्यात घेतले. या कारवाईत जवळपास 50 खासदार आणि सुमारे 250 जणांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती आहे.
पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांना सुमारे दोन तासांनी सोडण्यात आले. दोघेही किंग्सवे कॅम्पमधून एकाच गाडीतून निघाले. दरम्यान सुटका झाल्यानंतर राहुल गांधी यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत या कारवाईवर पहिली प्रतिक्रिया दिली.
राहुल गांधी यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटलंय की, “एकाही देशद्रोहीला सोडलं जाणार नाही.” पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहिली.
“लोकशाहीच्या देशद्रोह्यांना वाचवण्यासाठी लोकशाहीचे उरलेसुरले अवशेषही चिखलात ओढले गेले आहेत. याचा हिशोब चुकता केला जाईल. एकाही देशद्रोहीला सोडलं जाणार नाही,” असं राहुल गांधी यांनी म्हटलं.
दरम्यान, पोलिसांनी राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांना किंग्सवे कॅम्पमधून सोडले. त्यानंतर दोघेही एकाच गाडीतून निघाले.
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना पदावरून हटवावं, अशी मागणी विरोधी पक्षांकडून करण्यात येतेय. त्याचप्रमाणे मतदार याद्यांची सुरू असलेली विशेष SIR प्रक्रिया रद्द करावी, अशीही विरोधकांची मागणी आहे. या मागण्यांसाठी इंडिया आघाडीच्या खासदारांनी संसद भवनापासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयाकडे मोर्चा काढला होता. मात्र पोलिसांनी मोर्चाला अडवलं. त्यानंतर आकाशवाणी भवन परिसरात नेत्यांनी ठिय्या आंदोलन सुरू केले.
दिल्ली पोलिसांनी आंदोलनस्थळावरून काँग्रेस खासदार पवन खेरा, के. सी. वेणुगोपाल आणि अमरिंदर सिंग राजा वारिंग यांच्यासह अनेक नेत्यांना ताब्यात घेतलं. राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्यासोबत महाराष्ट्रातील काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे आणि वर्षा गायकवाड यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं.
रात्रभर आंदोलन करण्याची शक्यता लक्षात आल्यानंतर पोलिसांनी आंदोलनस्थळी कारवाई सुरू केली. पोलिसांनी आंदोलकांना त्या ठिकाणाहून हटण्यास सांगितलं. मात्र नेते आंदोलनावर ठाम राहिल्यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं.
दरम्यान भाजपने राहुल गांधी यांच्या आंदोलनावर टीका केली आहे. भाजपचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी पत्रकार परिषदेत काँग्रेसच्या आंदोलनावर प्रश्न उपस्थित केले. “कोणत्याही पक्षाने निवडणूक आयोगाकडे भेटीची वेळ मागितली नाही. विरोधकांकडे आता बोलण्यासारखे काहीही उरलेले नाही. त्यांचा खोटेपणा पुन्हा एकदा उघड झाला आहे,” असा दावा सुधांशू त्रिवेदी यांनी केला.
राहुल गांधींना 300 लोकांना घेऊन निवडणूक आयोगाकडे जायचं होतं. मात्र तिथे 300 लोकांसाठी जागा नाही, असंही त्यांनी म्हटलंय. या आंदोलनात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उपस्थित नव्हते, असा दावाही भाजपने केला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.