संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरूवात झाली. यंदाचे पावसाळी अधिवेशन देखील वादळी ठरण्याची शक्यता आहे. विरोधक वेगवेगळ्या मुद्द्यावरून मोदी सरकारला घेरण्याच्या तयारीत आहे. हे पावसाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माध्यमांशी संवाद साधला. 'हे पावसाळी अधिवेशन देशासाठी खूपच अभिमनास्पद असणार आहे. अंतराळात भारतीय तिरंगा फडकवणे हा देशातील प्रत्येक नागरिकासाठी अभिमानाचा क्षण आहे.' यावेळी पीएम मोदी यांनी ऑपरेशन सिंदूरचा उल्लेख करत जगाने भारतीय सैन्यांची ताकद पाहिली असल्याचे सांगितले.
संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वी पीएम मोदींनी सांगितले की, 'पावसाळी अधिवेशनात सर्वांचे स्वागत आहे. पाऊस हे नव सृजनचे प्रतीक आहे. आतापर्यंतच्या बातम्यांनुसार सध्या देशातील हवामान खूप चांगले आहे. शेतीसाठी फायदेशीर हवामान आहे. शेतकऱ्यांच्या अर्थव्यवस्थेत, देशाच्या अर्थव्यवस्थेत, ग्रामीण अर्थव्यवस्थेत आणि प्रत्येक कुटुंबाच्या अर्थव्यवस्थेत पाऊस महत्वाचा आहे. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार गेल्या १० वर्षांच्या तुलनेत यावेळी पाण्याचे साठे ३ पटीने वाढले आहेत. ज्यामुळे येत्या काळामध्ये देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठा फायदा होईल.'
पंतप्रधान मोदी म्हणाले की, 'या दशकात शांतता आणि प्रगती दिसून आली. रेड कॉरिडॉर आता हरित विकास क्षेत्रात रूपांतरित होत आहे. २०१४ पूर्वी महागाई दर दुहेरी अंकात होता आता तो जवळपास दोन टक्क्यांच्या आसपास आहे. सध्या महागाई कमी आहे आणि विकास दर जास्त आहे.' पीएम मोदींनी यावेळी बहुपक्षीय शिष्टमंडळांच्या आणि त्यांच्या पक्षांच्या खासदारांच्या परदेश दौऱ्यांचे कौतुक केले आणि त्यांनी सकारात्मक वातावरण निर्माण केल्याचे सांगितले. पंतप्रधान मोदींनी सशस्त्र दलांच्या शौर्याचे कौतुक केले आणि खासदार आणि विविध पक्षांना एकतेचा संदेश देण्याचे आवाहन केले.
पीएम मोदी पुढे म्हणाले की, 'हे अधिवेशन देशासाठी अभिमानास्पद आहे. हे अधिवेशन राष्ट्रीय अभिमानाचे आणि विजयोत्सवासारखे आहे. आंतरराष्ट्रीय अंतराळात प्रथमच भारतीय तिरंगा ध्वज फडकवणे हा देशातील प्रत्येक नागरिकासाठी अभिमानाचा क्षण आहे. हा एक यशस्वी प्रवास आहे ज्याने देशाला विज्ञान आणि नाविण्यतेकडे नेले आहे. सर्वजण या अभिमानाच्या क्षणाच्या अनुभव घेत आहे. सर्वांकडून कोतुक केले जात आहे.'
ऑपरेशन सिंदूरचा उल्लेख करताना पीएम मोदी म्हणाले की, 'ऑपरेशन सिंदूरदरम्यान जगाने भारतीय सैन्याची ताकद पाहिली. ऑपरेशन सिंदूर अंतर्गत २२ मिनिटांत दहशतवाद्यांचे अड्डे जमीनदोस्त करण्यात आली. संपूर्ण जगाने मेक इन इंडियाची शक्ती पाहिली आहे. मेड इन इंडिया लष्करी शक्तीच्या या नवीन स्वरूपाकडे जग खूप आकर्षित झाले आहे. मी जेव्हा जेव्हा परदेशात माझ्या सहकाऱ्यांना भेटतो तेव्हा त्याचे कौतुक केले जाते.'
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.