शनिवार, दुपारची ३.३५ ची वेळ. भारताच्या डीजीएमओमध्ये फोन खणाणला. तो फोन होता पाकिस्तानच्या डीजीएमओमधून. पहिला संवाद पाकिस्तानच्या डीजीएमओच्या अधिकाऱ्याकडून सुरू झाला. भारताच्या डीजीएमओमधून सकारात्मक प्रतिसाद मिळाला. दोन्ही अधिकाऱ्यांमध्ये चर्चा झाली. त्यानंतर दोन्ही देशांमध्ये टिपेला पोहोचलेल्या संघर्षाला अखेर पूर्णविराम मिळाला. दोन्ही देशांनी युद्धविरामावर सहमती दर्शवली.
दहशतवादावर प्रहार केल्यानं बिथरलेला पाकिस्तान भारताच्या प्रत्युत्तरानं गयावया करायला लागला. भारत आणि पाकिस्तान यांच्यात तणाव शिगेला पोहोचला. दुसऱ्यासाठी खड्डा खोदायला गेलेल्या पाकिस्तानला आपण स्वतःसाठीच खड्डा खोदतोय, हे वेळीच लक्षात आलं आणि त्यांनी केलेली घोडचूक दुरुस्त केली. शनिवारी दुपारी ३ वाजून ३५ मिनिटांनी पाकिस्तानच्या डीजीएमओमधून भारताच्या डीजीएमओमध्ये फोन गेला. दोन्ही अधिकाऱ्यांमध्ये चर्चा झाली. त्यानंतर दोन्ही देशांमध्ये आज संध्याकाळी पाच वाजल्यापासूनच शस्त्रसंधी लागू करण्यावर सहमती झाली.
अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सर्वात आधी या शस्त्रसंधीबाबतची माहिती दिली. त्यांनी एक्सवर एक पोस्ट शेअर केली. भारत आणि पाकिस्तान या दोन देशांत अमेरिकेच्या मध्यस्थीने शस्त्रसंधी झाली, अशी वार्ता त्यांनी अख्ख्या जगाला दिली. भारताने आणि पाकिस्ताननं दाखवलेल्या समजूतदारपणाचं त्यांनी मुक्तकंठानं कौतुक केलं.
पहलगाम हल्ल्यानंतर ऑपरेशन सिंदूर
२२ एप्रिल रोजी पहलगामवर दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात २६ निष्पाप पर्यटकांचा मृत्यू झाला. भारताला प्रचंड चीड आली. पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाचं कंबरडं मोडायचंच असा चंग भारतानं बांधला. भारतानं ऑपरेशन सिंदूर हाती घेतलं. ते तडीस नेलं. पाकिस्तान आणि पीओकेमध्ये आश्रयाला असलेल्या दहशतवाद्यांचे अड्डे हवाई हल्ल्याने उद्ध्वस्त केले. शेकडो दहशतवाद्यांना यमसदनी धाडलं. पाकिस्तान बिथरला. त्यानं भारतावरच हल्ले करण्यास सुरुवात केली. पण बलाढ्य भारतानं मग्रुर पाकिस्तानच्या नांग्या वेळोवेळी ठेचल्या. प्रत्येक हल्ला मोडून काढला.
फुशारक्या मारणाऱ्या पाकिस्तानला गुडघे टेकायला भाग पाडलं. दोन्ही देशांमध्ये तणाव वाढला. पण आपली मस्ती जिरलीय हे पुरतं लक्षात आल्यावर पाकिस्ताननं रडगाणं सुरू केलं. आर्थिक मदतीसाठी इतर देशांकडं हात पसरायला सुरुवात केली. भारताचा कठोर प्रहार कुठल्याच आघाड्यांवर झेलता येणार नाही, हे लक्षात येताच कोल्हेकुई करणाऱ्या पाकिस्ताननं मुरकुंडी घातली. अखेर शनिवारी दुपारी पाकिस्तानच्या डीजीएमओनं भारताच्या डीजीएमओंना फोन केला. दीर्घ चर्चेनंतर दोन्ही देशांनी शस्त्रसंधीवर सहमती दर्शवली.
शस्त्रसंधीवर द्विपक्षीय सहमती झाल्यानंतर भारतीय वेळेनुसार आज संध्याकाळी ५ वाजल्यापासूनच जमीन, आकाश आणि समुद्र अशा तिन्ही पातळ्यांवर गोळीबार आणि सैन्य कारवाई बंद करण्याचा निर्णय घेतला. आता शस्त्रसंधीबाबतच्या चर्चेच्या फेऱ्या सुरू होणार आहेत. डीजीएमओंकडून येत्या १२ मे रोजी पुन्हा चर्चा होणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.