मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात इंडिया आघाडीचे आंदोलन
ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याची होतेय मागणी
या सर्व घडामोडीदरम्यान इंडिया आघाडीत फूट पडल्याची चर्चा
मल्लिकार्जुन खरगे यांनी आयोजित केलेल्या स्नेहभोजनात सपा नेत्यांची अनुपस्थिती
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि निवडणूक आयोगाविरोधात इंडिया आघाडी आक्रमक झाली आहे. दिल्लीमध्ये इंडिया आघाडीच्या खासदारांकडून आंदोलनं केली जात आहेत. ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. अशातच आज सकाळी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी दिल्लीमध्ये स्नेहभोजनाचे आयोजन केले होते. इंडिया आघाडीच्या खासदारांनी निवडणूक आयोगाच्याविरोधात केलेल्या आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशीच दिल्लीतील जनपथ रोडवरील सागर रत्ना हॉटेलमध्ये या स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी समाजवादी पार्टीचा एकही नेता उपस्थित नसल्याची माहिती समोर आली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, समाजवादी पार्टीने सांगितले की, काँग्रेसने या स्नेहभोजनासाठी आम्हाला आमंत्रित केले नव्हते. पण याबाबत अद्याप काँग्रेसकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. निवडणूक आयोगाच्या विरोधातील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सर्व विरोधी पक्षाच्या खासदारांमध्ये समन्वय राहावा यासाठी मल्लिकार्जुन खरगे यांनी इंडिया आघाडीच्या खासदारांसाठी स्नेहभोजनाचे आयोजन केले होते.
इंडिया आघाडीच्या खासदारांनी मंगळवारी संसदेपासून ते निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर मोर्चा काढला होता. पोलिसांनी हा मोर्चा संसद मार्गावर बॅरिकेट्स लावून अडवला. त्यावेळी इंडिया आघाडीच्या खासदारांनी त्या ठिकाणीच ठिय्या मांडला. यावेळी दिल्ली पोलिसांनी आंदोलन करणाऱ्या १० खासदारांसह २६० जणांना ताब्यात घेतलं. ताब्यात घेतल्यानंतर काही वेळातच त्यांना सोडून देण्यात आले.
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी, समाजवादी पार्टीचे नेते अखिलेश यादव आणि टीएमसीचे नेते या आंदोलनस्थळी उपस्थित होते. पोलिसांकडून सतत सर्व खासदारांना रोखले जात होते. तरी देखील राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी ऑल इंडिया रेडिओ बिल्डिंगच्या परिसरामध्ये आपले आंदोलन तसेच सुरू ठेवले. दिल्ली पोलिसांनी त्यांना जबरदस्ती ताब्यात घेण्यापूर्वी जवळपास ८ तास त्यांनी त्याठिकाणी आंदोलन केले.
निवडणूक आयोग आणि निवडणूक प्रणालीच्या कार्यपद्धतीवर विरोधी पक्षांकडून वाढत्या टीकेनंतर या घडामोडी घडल्या आहेत. इंडिया आघाडीकडून आंदोलनाबाबत पुढील योजना आखल्या जात असताना सर्व खासदारांमध्ये एकजूट कायम ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यासोबतच बुधवारी इंडिया आघाडीच्या सर्व खासदारांना दिल्लीमध्येच थांबण्यास सांगण्यात आले होते.
दरम्यान, मल्लिकार्जुन खरगे यांनी आज आयोजित केलेल्या स्नेहभोजनामध्ये इंडिया आघाडीमधील सर्व पक्षांसोबत आणि खासदरांसोबत समन्वय साधण्याची, चर्चा करण्याची आणि या आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्याची चांगली संधी होती पण या स्नेहभोजनाला समाजवादी पार्टीचा एकही खासदार उपस्थित नसल्यामुळे आता चर्चांना उधाण आले आहे. इंडिया आघाडीमध्ये फूट पडली की काय? अशा चर्चा आता होऊ लागल्या आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.