व्हाईट हाऊसमध्ये झालेल्या द्विपक्षीय चर्चेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. या परिषदेत दोन्ही देशांमधील महत्त्वाच्या करारांची माहिती देण्यात आली. पंतप्रधान मोदी यांनी २०३० पर्यंत भारत-अमेरिका व्यापार दुप्पट करण्याचा संकल्प व्यक्त केला, तर ट्रम्प यांनी मोदी यांना स्वतःपेक्षा उत्कृष्ट टफ निगोशिएटर म्हटले. वाटाघाटी करण्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा कोणीही हात धरू शकत नाही. यामध्ये ते माझ्यापेक्षा कितीतरी पटींनी उत्तम आहेत असे ट्रम्प म्हणाले. पत्रकार परिषदेत विविध प्रश्नांना उत्तर देताना दोन्ही नेत्यांनी द्विपक्षीय संबंध अधिक मजबूत करण्याचा दृढनिश्चय व्यक्त केला.
संयुक्त पत्रकार परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या अद्वितीय स्वागताबद्दल आणि आदरातिथ्याबद्दल आभार मानले. पंतप्रधान मोदी म्हणाले, राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या नेतृत्वामुळे भारत-अमेरिका संबंध अधिक दृढ झाले आहेत. त्यांनी दहशतवादाविरोधी लढाईत सहकार्य करण्याची आणि सीमापार दहशतवादाविरुद्ध कठोर पावले उचलण्याची गरज अधोरेखित केली. तसेच, २६/११ चा दहशतवादी तहव्वुर राणा याचे प्रत्यार्पण करण्याच्या निर्णयाबद्दल ट्रम्प यांचे आभार मानले आणि भारतीय न्यायव्यवस्था त्याला योग्य न्याय देईल, असा विश्वास व्यक्त केला. मोदी म्हणाले, भारत-अमेरिका एकता आणि सहकार्यामुळे आपण एक चांगले आणि सुरक्षित जग घडवू शकतो.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकन लोकांच्या परिचित 'मेक अमेरिका ग्रेट अगेन' (MAGA) या ब्रीदवाक्यासोबत भारताच्या २०४७ पर्यंत विकसित देश होण्याच्या दृढ संकल्पाचा संदर्भ दिला. त्यांनी म्हटले की, भारतातील लोक वारसा आणि विकासाच्या मार्गावर प्रगतीच्या दिशेने वेगाने वाटचाल करत आहेत, ज्याला 'MIGA' म्हणजे 'मेक इंडिया ग्रेट अगेन' असे म्हणता येईल. मोदी यांनी स्पष्ट केले की, जेव्हा अमेरिका आणि भारत 'MAGA' आणि 'MIGA' म्हणून एकत्र काम करतात, तेव्हा ती 'MEGA' म्हणजेच समृद्धीसाठी भव्य भागीदारी होते. त्यांनी या भागीदारीला दोन्ही देशांच्या ध्येयांसाठी प्रेरणादायी आणि विस्तारित व्याप्ती देणारी ठरवले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताच्या संरक्षण क्षमतांमध्ये अमेरिकेच्या महत्त्वपूर्ण भूमिकेचा उल्लेख केला. त्यांनी सांगितले की, दोन्ही देश धोरणात्मक भागीदारीसह संयुक्त विकास, उत्पादन, आणि तंत्रज्ञान हस्तांतरणावर काम करत आहेत. "TRUST" उपक्रमांतर्गत, धोरणात्मक तंत्रज्ञानाचा वापर करून संबंधांमध्ये परिवर्तन घडवण्यावर सहमती झाली आहे. यामध्ये महत्त्वपूर्ण खनिजे, प्रगत साहित्य, आणि औषधांच्या मजबूत पुरवठा साखळीच्या निर्मितीवर विशेष भर दिला जाईल.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत-अमेरिका भागीदारी लोकशाही मूल्ये मजबूत करत असल्याचे नमूद केले. त्यांनी इंडो-पॅसिफिकमध्ये शांतता, स्थिरता, आणि समृद्धीसाठी क्वाडच्या भूमिकेचे महत्त्व अधोरेखित केले. दहशतवादाविरोधी लढाईत दोन्ही देश खंबीरपणे एकत्र उभे आहेत. सीमापार दहशतवाद संपवण्यासाठी ठोस कारवाईची आवश्यकता आहे, यावरही सहमती झाली आहे, असे पंतप्रधानांनी स्पष्ट केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०३० पर्यंत भारत-अमेरिका द्विपक्षीय व्यापार दुप्पट करून ५०० अब्ज डॉलर्सपर्यंत नेण्याचे लक्ष्य जाहीर केले. परस्पर फायदेशीर व्यापार करार अंतिम करण्यासाठी दोन्ही देशांचे संघ कार्यरत आहेत. अमेरिकेतील भारतीय समुदाय महत्त्वाचा दुवा असल्याचे नमूद करत, त्यांनी लॉस एंजेलिस आणि बोस्टन येथे भारतीय वाणिज्य दूतावास लवकरच स्थापन होणार असल्याची घोषणा केली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.