उत्तर प्रदेशातील उन्नाव जिल्ह्यात बुधवारी सकाळी भीषण रस्ता अपघात झाला. आग्रा-लखनऊ एक्सप्रेसवेवर भरधाव वेगाने धावणाऱ्या स्लीपर बसचं नियंत्रण अचानक सुटलं. बसने आधी समोरून येणाऱ्या कारला जोरदार धडक दिली आणि त्यानंतर रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्यात पलटी झाली. या भीषण अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला तर अनेक प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच पोलीस, प्रशासन आणि बचाव पथकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले.
मिळालेल्या माहितीनुसार, ही स्लीपर बस हरियाणाहून बिहारकडे जात होती. बसमध्ये जवळपास 85 प्रवासी प्रवास करत होते. दुसरीकडे, करामध्ये आठ जण बसले होते. अपघातात कारमधील तीन जण आणि बसमधील 17 जण जखमी झाले आहेत. गंभीर जखमींना तातडीने लखनऊ इथल्या ट्रॉमा सेंटरमध्ये उपचारासाठी पाठवण्यात आलंय.
हा अपघात बांगरमऊ परिसरातील आग्रा-लखनऊ एक्सप्रेसवेवरील 230 व्या किलोमीटरजवळ देवखरी गावाजवळ घडला. हरियाणाहून बिहारकडे मजुरांना घेऊन जाणारी बस अचानक चालकाच्या नियंत्रणाबाहेर गेली. बसने रस्त्यावरील डिव्हायडर तोडला आणि विरुद्ध दिशेच्या मार्गावर शिरली. त्याचवेळी समोरून येणारी कार बसच्या समोर आली. बसने कारला जोरदार धडक देत चिरडलं आणि त्यानंतर खड्यात जाऊन पलटी झाली.
अपघातानंतर परिसरात मोठी आरडाओरड सुरू झाली. स्थानिक नागरिक, पोलीस आणि बचाव पथकांनी तातडीने जखमींना बाहेर काढून बांगरमऊ इथल्या रुग्णालयात दाखल केले.
रुग्णालयातील डॉक्टरांनी कारमधील दिव्या (6), अमृता (13), अंजू (40), धुनमुन (60) आणि कार चालक विनोद (45) यांचा मृत्यू झाला आहे. विनोद हे बदलू प्रसाद यांचे पुत्र असून ते संत कबीरनगर जिल्ह्यातील खलीलाबाद कोतवाली हद्दीतील तेनुहारी सोयम गावचे रहिवासी होते.
प्राथमिक माहितीनुसार, मृत्यू झालेले पाचही जण एकाच कुटुंबातील असल्याचं सांगितलं जातंय. तसंच बांगरमऊ रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या जखमींपैकी 12 जणांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी दुसऱ्या रुग्णालयात रेफर करण्यात आले.
अपघाताच्या वेळी बस हरियाणाहून बिहारकडे निघाली होती. तर कारमधील सर्वजण लखनऊहून आग्राच्या दिशेने प्रवास करत होते. मृत्यू झालेल्या व्यक्ती एकमेकांचे नातेवाईक आणि जवळचे कुटुंबीय असल्याची माहिती समोर आली आहे.
या घटनेनंतर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी तपास सुरू करण्यात आलाय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.