आजकाल वाहतुकीचे नियम कडक झालेत. गाडी चालवताना एखादा नियम चुकून मोडला तरी ई-चलान होऊ शकतं. अनेक वेळा चलानाची रक्कम जास्त असते. त्यामुळे काही लोक ते लगेच भरत नाहीत. पण चलान वेळेवर भरलं नाही तर ते तसंच थकबाकी राहतं. पुढे त्याची रक्कम आणि अडचणी वाढू शकतात.
तुमच्या गाडीवरही जुनं चलान बाकी असेल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. 12 सप्टेंबर 2026 रोजी देशातील सर्व जिल्हा न्यायालयांमध्ये राष्ट्रीय लोकअदालत होणार आहे. या लोकअदालतीमध्ये काही जुन्या वाहतूक चलानांचा कमी पैशांत निपटारा करण्याची संधी मिळू शकते.
लोकअदालतीमध्ये चलान भरताना सर्वात मोठा फायदा म्हणजे कमी पैसे भरावे लागू शकतात. पात्र प्रकरणांमध्ये चलानाच्या दंडाच्या रकमेत चांगली सूट मिळू शकते. त्यामुळे खूप दिवसांपासून बाकी असलेले चलान कमी रकमेत भर प्रकरण संपवता येऊ शकते.
लोकअदालतीमध्ये दोन्ही बाजूंच्या संमतीने प्रकरणाचा निर्णय घेतला जातो. एकदा निर्णय झाल्यानंतर तो अंतिम असतो. या निर्णयाविरोधात दुसऱ्या न्यायालयात अपील करता येत नाही. यामुळे कोर्टाच्या वारंवार फेऱ्या, जास्त वेळ आणि कायदेशीर कामासाठी होणारा अतिरिक्त खर्च वाचू शकतो. चलान भरल्यानंतर परिवहन विभागाच्या पोर्टलवरही वाहनावरील बाकी चलानाची नोंद अपडेट केली जाते.
लोकअदालतीत फक्त तडजोड करून मिटवता येणारी प्रकरणं घेतली जातात. जसं की, खालील कारणांमुळे चलान झालं असेल तर त्याचा फायदा मिळू शकतो -
गाडी खूप वेगाने चालवणं
चुकीच्या ठिकाणी गाडी पार्क करणं
लाल सिग्नल मोडणं
हेल्मेट न घालणं
सीट बेल्ट न लावणं
गाडी चालवताना मोबाईल वापरणं
पीयूसी नसणं
गाडीचा विमा नसणं
परंतु दारू पिऊन गाडी चालवण्यासारखी गंभीर प्रकरणे लोकअदालतीमध्ये घेतली जात नाहीत. खूप जुनी चलानही काही प्रकरणांमध्ये लोकअदालतीत मिटवता येऊ शकतात. न्यायालयात गेलेली काही जुनी चलानंही नियमांनुसार लोकअदालतीत मिटवता येऊ शकतात.
लोकअदालतीचा फायदा घ्यायचा असेल तर संबंधित जिल्हा न्यायालयात जावं लागणार आहे. यावेळी जाताना काही कागदपत्रं सोबत ठेवणं गरजेचं आहे.
ही कागदपत्रे सोबत ठेवा-
बाकी असलेल्या चलानाची प्रिंट
गाडीची आरसी
ड्रायव्हिंग लायसन्स
गाडीच्या विम्याची प्रत
पीयूसी प्रमाणपत्र
न्यायालयात चलानासाठी हेल्प डेस्क असतो. त्याठिकाणी तुमच्या गाडीवर किती चलान बाकी आहे, याची माहिती तपासली जाईल. यानंतर तुमचं प्रकरण न्यायाधीशांसमोर ठेवलं जाणार आहे. तिथे दोन्ही बाजूंच्या संमतीने किती रक्कम भरायची, हे ठरवलं जाईल. ठरलेली रक्कम भरल्यानंतर तुम्हाला पावती दिली जाईल. त्यानंतर तुमच्या गाडीवरील बाकी चलानाची नोंद अपडेट केली जाईल.
चलान खूप दिवस भरले नाही, तर पुढे काही अडचणी येऊ शकतात.
गाडीचा विमा रिन्यू करताना अडचण येऊ शकते.
गाडीची एनओसी मिळवताना समस्या येऊ शकते.
गाडीची आरसी दुसऱ्या व्यक्तीच्या नावावर करताना अडचण येऊ शकते.
खूप दिवस चलान बाकी राहिल्यास वाहतूक पोलिसांकडून कोर्टात हजर राहण्यासाठी समन्स येऊ शकतो.
त्यामुळे तुमच्या गाडीवर जुने ई-चलान बाकी असेल तर ते तसंच ठेवू नका. 12 सप्टेंबर 2026 रोजी होणाऱ्या राष्ट्रीय लोकअदालतीत तुमचं चलान भरून प्रकरण मिटवता येईल का, याची माहिती घ्या. पात्र असल्यास कमी रकमेत चलान भरून हे प्रकरण संपवण्याची संधी मिळू शकते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.