Elections Analysis: भाजपचे हिंदुत्वाच्या ‘रिपॅकेजिंग'चे मॉडेल सुपरहीट! - Saam TV
देश विदेश

Elections Analysis: भाजपचे हिंदुत्वाच्या ‘रिपॅकेजिंग'चे मॉडेल सुपरहीट!

धार्मिक ध्रुवीकरणाच्या जोडीला विकासाची कामे व गरीब कल्याण योजनांचा लाभ थेट लोकांच्या स्वयंपाकघरापर्यंत पोहोचविण्यात आलेले जास्त यश आणि हेच भाजपच्या चार राज्यांतील फेरविजयाचे ठळक कारण मानले जाते

Amit Golwalkar

(मंगेश वैशंपायन)
नवी दिल्ली : ‘मोदीयुगातील भाजपने हिंदुत्वाचे ‘रिपॅकेजिग' केले ते पुन्हा हीट ठरले,‘... उत्तर प्रदेशासह चार राज्यांतील भाजपच्या सत्तावापसीचा कल स्पष्ट होताना भाजप मुख्यालयात एका पक्षनेत्याने व्यक्त केलेले हे मत निश्चितपणे महत्त्वाचे आहे. (Analysis about BJP Success in four states elections)

हे रिपॅकेजिंग कोणते? तर हिंदुत्वाच्या आणि धार्मिक ध्रुवीकरणाच्या जोडीला विकासाची कामे व गरीब कल्याण योजनांचा लाभ थेट लोकांच्या स्वयंपाकघरापर्यंत पोहोचविण्यात आलेले जास्त यश आणि हेच भाजपच्या (BJP) चार राज्यांतील फेरविजयाचे ठळक कारण मानले जाते. २०- २२ हजारांचा मतदारसंघ असलेल्या गोव्यापासून (Goa) ४-५ लाखांचा मतदारसंघ असलेला उत्तर प्रदेशापर्यंत संघटनात्मक पातळीवर संपूर्ण ‘गृहपाठ' करूनच रणांगणात उतरायचे ही नरेंद्र मोदी, विशेषतः अमित शहा (Amit Shah) यांनी ८ वर्षांपासून घालून दिलेली कार्यसंस्कृती भाजपमध्ये आता रुजली आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत व्यवस्थेची वेशीवर टांगलेली लक्तरे, ऑक्सिजन, रूग्णालयातील बेडचा दुष्काळ, गंगेच्या पाण्यावर तरंगणारे मृतदेह इथपासून स्वतंत्र भारतातील विक्रमी बेरोजगारी, शेती उध्वस्त करणाऱ्या मोकाट जनावरांचा हैदोस या मुद्यांकडे दुर्लक्ष करून यूपी, गोवा, उत्तराखंडातील मतदारांनी भाजपच्या पारड्यात टाकलेले माप हा २०२४ मधील विजयाचा भक्कम पाया ठरणार, असे आता चर्चिले जात आहे.

मोदी असोत की योगी, नेत्यांच्या व्यक्तिगत बदनामीचे प्रकार जनता सहन करत नाही हे या निकालातून दिसलेले दुसरे वास्तव ! वाराणसीत माणूस अखेरच्या दिवसांत जातो, हा अखिलेश यादव यांनी मोदींना उद्देशून वापरलेला बाण भारतातील काही माध्यमे व ‘डॉन’पासून न्यूयॉर्क टाईम्सपर्यंत ठळक बातमीचा विषय भले होऊ शकत असेल, पण त्यामुळे जनतेच्या मनात प्रतिकूल संदेशकिरणे जातात हेही भाजपच्या विजयाने दिसले. ‘एमआयएम’चे असददुद्दिन ओवेसी यांच्या पक्षाची यूपीच्या मुस्लिम मतदारांनी जी भीषण अवस्था करून टाकली ती ओवेसींना पुढची बरीच वर्षे लक्षात राहील !

अब्बाजान- चाचाजान, कब्रस्तान, ८० टक्के विरूद्ध २० टक्के हे ध्रुवीकरण कार्ड खेळतानाच दुसरीकडे मोफत रेशन लाखो गरीबांच्या थेट स्वयंपाकघरापर्यंत पोहोचविण्याच्या योजनेला होळीपर्यंत मुदतवाढ, पंतप्रधान किसान सन्मान योजनेचे पैसे पोचविणे, स्वयंसहायता गटाच्या १६ लाख महिलांच्या बॅंक खात्यांत प्रत्येकी १००० रुपये पोहोचविणे, सुमंगला योजनेचे २० कोटी रूपये १ लाख लाभार्थींना मिळणे, ३ कोटी स्थलांतरित मजुरांना मिळालेले डिसेंबर ते मार्चपर्यंत १००० रूपये, ५६ लाख ज्येष्ठ नागरिकांसाठी ६७० कोटींची निवृत्तीवेतन योजना यांचा लाभ मिळणारा किती मोठा वर्ग भाजपच्या बाजूने उभा राहिला. काशी विश्वनाथ कॉरिडॉरचे उद्घाटन करतानाच,

जेवार विमानतळाचे भूमिपूजन, राष्ट्रीय महामार्ग, प्रत्येक रूग्णालयात किमान एका ऑक्सिजन प्रकल्पाची उभारणी यासारखी विकास कामे प्रत्यक्षात आणून, लोकांना दिसेल असा विकास भाजपने केला. या निकालानंतर ‘आता मोदींनंतर योगी‘ किंवा योगीच यापुढचे पंतप्रधान, अशी जी चर्चा प्रसार माध्यमांत सुरू झाली ती निव्वळ अज्ञानमूलक आहे. मुळात योगी यांना मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार जाहीर करण्यासच ‘दिल्ली‘ पूर्ण अनुकूल होती का असे शंकेचे वातावरण होते.

मात्र एकदा योगींची उमेदवारी जाहीर झाल्यावर मात्र मतभेद पडद्यावर दूरान्वयेही दिसणार नाहीत हे दाखविण्यात भाजपचे सर्सेसर्वा नेतृत्व यशस्वी झाले हे निकालच सांगतात. योगींच्या खांद्यावर मोदी यांनी हात टाकलेले छायाचित्र व्हायरल करण्यापासून ‘यूपी और योगी, बहोत है उपयोगी‘ असे मोदींनीच सांगणे यातून ‘केडरला‘ योग्य तो मेसेज गेला.मोदी यांनी आता देवेंद्र फडणवीस, अनुराग ठाकूर आदी राज्याराज्यांतील युवा नेत्यांची दुसरी नेतृत्व फळी समोर आणण्याची योजना सुरू केली त्यात योगींना अग्रस्थान असणार हे नक्की.

Edited By - Amit Golwalkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Police Death: पोलीस दलात आत्महत्येचं सत्र काही थांबेना! ४ दिवसात ३ आत्महत्या, काय आहे कारण?

Mahalaxmi Vrat 2025 : महालक्ष्मी व्रताची तारीख, पूजा विधी, महत्व घ्या जाणून

Maharashtra Live News Update: ते वक्तव्य करून अजित पवारांकडून मला टॉर्चर करण्याचा प्रयत्न; राम शिंदेंचा आरोप

Gunfire Shooting : क्लबमध्ये अंदाधुंद गोळीबार! तिघांचा जागीच मृत्यू, आठजण जखमी

Astro Tips: सकाळी उठल्यावर आरशात पाहणे शुभ असते की अशुभ?

SCROLL FOR NEXT