पार्टीच्या बहाण्याने मुलींना फार्महाऊसवर बोलवणे आणि त्यांच्याबरोबर इतर मुलींना सोबत घेऊ येण्यासाठी दबाव आणणे. पार्टीला आल्यानंतर त्या मुलींवर अत्याचार करण्याचे प्रकार कित्येक दिवस सुरू होते. अत्याचाराला बळी पडलेल्या मुलींना कुठेही वाच्यता न करण्याची धमकी दिली जात असे. मुलींचे नग्न फोटो काढून पु्न्हा ब्लॅकमेल केलं जायचं. जवळपास ३२ वर्षांपूर्वी अजमेरमध्ये १०० मुली या अत्याचाराच्या बळी पडल्या होत्या. १९९२ मध्ये घडलेल्या या घटनेने राजस्थानसह संपूर्ण देश हादरला होता. आज या घटनेतील ६ आरोपींना जन्मठेपीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. तर प्रत्येकी 5 लाखांचा दंडही ठोठावण्यात आली आहे.
अजमेरच्या विशेष न्यायालयाने आज यासंदर्भात निकाल दिला. नफीस चिश्ती, नसीम उर्फ टारझन, सलीम चिश्ती, सोहिल गनी, सय्यद जमीर हुसेन आणि इक्बाल भाटी या सहा आरोपींना न्यायालयाने दोषी ठरवलं आहे. शालेय आणि महाविद्यालयीन मुलींवर सामूहिक बलात्कार आणि ब्लॅकमेलिंगलच्या या प्रकरणात 18 आरोपी होते. त्यातील 9 जणांना शिक्षा झाली आहे. एक आरोपी दुसऱ्या गुन्ह्यात कारागृहात शिक्षा भोगत आहे. यातील एकाने आत्महत्या केली आहे तर एकजण सध्या फरार आहे.
नेमकं काय आहे प्रकरण?
अजमेरमधील युवक काँग्रेसचे तत्कालीन अध्यक्ष फारुख चिश्ती हे त्याच्यासह फार्महाऊस आणि रेस्टॉरंटमध्ये पार्ट्यांच्या नावाने मुलींना बोलवत असतं. उच्चभ्रू सोसाटीमधील मुली त्यांच्या जाळ्यात अडकत होत्या. पार्टीला आल्यानंतर त्यांचे साथीदार त्यांच्यावर बलात्कार करत असत आणि नंतर नग्न फोटो काढून ब्लॅकमेल केलं जात असे. पार्टीला आल्यानंतर त्यांना त्यांच्या मैत्रीनींनाही सोबत आणण्याचा दबाव आणला जात असे. पार्टीच्या या मोहजाळात शालेय आणि महाविद्यालयीन मुली अडकत गेल्या. एक नाही दोन नाही तर १०० मुली फारुख चिश्ती आणि त्यांच्या जाळ्यात अडकल्या होत्या. सर्व मुली १७-२० वयोगटातील होत्या.
मुलींचे नग्न फोटो आरोपींकडे असल्यामुळे कोणीही कुठेही वाच्यता करत नव्हतं. अखेर एका वृत्तपत्राने हे प्रकरण जगासमोर आलं. त्या दिवशी सकाळी या प्रकरणाची बातमी असलेल वृत्तपत्र हाती पडलं तेव्हा अख्ख राजस्थान हादरलं होतं. त्यानंतर हे प्रकरण वणव्यासारखं संपू्र्ण देशभर पसरलं. या वृत्तानंतर काही मुली पुढे आल्या आणि त्यांनी संपूर्ण प्रकरण पोलिसांसमोर कथन केलं, मात्र त्यांनाही धमक्या येत होत्या. कित्येक दिवस उलटूनही कारवाई होत नव्हती.
अखेर या प्रकरणाची जागा जनआंदोलनाने घेतली आणि कारवाईसाठी दबाव वाढत गेली. सरकारने प्रकरण सीबीआयकडे सोपवलं. तपासात फारूख चिश्ती, उपाध्यक्ष नफीस चिश्ती, सहसचिव अन्वर चिश्ती, काँग्रेसचे माजी आमदार अल्मास महाराज यांचे निकटवर्तीय, इशरत अली, इक्बाल खान, सलीम, जमीर, सोहेल गनी, पुत्तन अलाहाबादी, नसीम अहमद उर्फ टारझन, परवेझ अन्सारी, मोहिबुल्ला उर्फ मॅराडोना, कैलाश सोनी, महेश लुधानी, पुरुषोत्तम उर्फ जॉन वेस्ली उर्फ बबना आणि हरीश तोलानी यांची नावं समोर आली.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.