पिंपरी-चिंचवडमध्ये गणपती विसर्जन मिरवणुकीतील मोठ्या आवाजातील डीजे-डॉल्बीवर पोलिसांची कारवाई
9 ते 10 गणेश मंडळांविरोधात गुन्हे दाखल
मोठ्या प्रमाणात साहित्य जप्त
पुण्यात गणेशोत्सवाच्या सुरुवातीच्या दिवसांपासून डीजेच्या आवाजावरून मोठ्या प्रमाणावर वाद निर्माण झाले. या पार्श्वभूमीवर कडक निर्बंध लागू केले. दरम्यान आता पुण्यातील पिंपरी चिंचवडमध्ये गणपती विसर्जन मिरवणुकीत मर्यादेपेक्षा जास्त आवाजात डीजे आणि डॉल्बी साउंड वाजवणे काही गणेश मंडळांना चांगलेच महागात पडले आहे. ध्वनी प्रदूषणाच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी सांगवी पोलिसांनी शहरातील सुमारे नऊ ते दहा गणेश मंडळांविरोधात गुन्हे दाखल केले आहेत. या कारवाईदरम्यान पोलिसांनी मोठ्या प्रमाणात डीजे साहित्य आणि इतर उपकरणे जप्त केली आहेत.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून गणेश मंडळांना ध्वनी प्रदूषणासंदर्भात वारंवार सूचना देण्यात आल्या होत्या. विसर्जन मिरवणुकीदरम्यान आवाजाच्या मर्यादेचे पालन करावे, तसेच जास्त आवाजात डीजे, डॉल्बी वापरू नयेत, अशा स्पष्ट सूचना मंडळांना देण्यात आल्या होत्या. मात्र, काही मंडळांकडून या सूचनांकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचे पोलिसांच्या कारवाईत समोर आले.
विसर्जन मिरवणुकीदरम्यान काही ठिकाणी अत्यंत मोठ्या आवाजात डीजे-डॉल्बी साउंड वाजवण्यात येत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. पोलिस विभागाने ठरवून दिलेल्या ध्वनी मर्यादेपेक्षा जास्त आवाजात डीजे-डॉल्बी आढळून आल्यानंतर संबंधित मंडळांवर कायदेशीर कारवाई करण्यात आली. या कारवाईमध्ये पोलिसांनी पाच डीजे मिक्सर, दोन डीजे कन्सोल, एक लाईट कंट्रोल मशीन, तीन लॅपटॉप, एक स्पीकर तसेच डीजे सेट, ट्रॅक्टर-ट्रॉली आणि मिक्सर असा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी पुढील तपास सांगवी पोलीस करत आहेत.
गणपती विसर्जन मिरवणुका शांततेत आणि नियमांचे पालन करून पार पडाव्यात, यासाठी पोलिसांकडून यंदा ध्वनी प्रदूषणाच्या मुद्द्यावर विशेष लक्ष देण्यात आले होते. मिरवणुकीत उत्साह आणि जल्लोष कायम ठेवताना ध्वनी प्रदूषणाच्या नियमांचे उल्लंघन होऊ नये, यासाठी मंडळांनी पोलिसांच्या सूचनांचे पालन करणे आवश्यक असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले होते. दरम्यान, पोलिसांच्या या कारवाईमुळे विसर्जन मिरवणुकीत नियमांचे उल्लंघन करणाऱ्या गणेश मंडळांमध्ये खळबळ उडाली आहे. पुढील काळातही ध्वनी प्रदूषणाच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई केली जाण्याची शक्यता आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.