Surabhi Jayashree Jagdish
हिवाळा सुरू झाला की बाईक चालवणाऱ्यांच्या अडचणी वाढतात. सकाळी तापमान कमी असताना बाईक सुरू करताना त्रास होऊ शकतो. काही बाईक एका प्रयत्नात सुरू होतात, तर काहींना सुरू होण्यासाठी थोडा वेळ लागतो. त्यामुळे अनेकजण बाईक सुरू केल्यानंतर काही मिनिटं ती जागेवरच चालू ठेवतात, जेणेकरून प्रवास सुरू करण्यापूर्वी इंजिन व्यवस्थित काम करू लागेल.
आता बाईकच्या तंत्रज्ञानात मोठे बदल झाले आहेत. आधुनिक बाईकमध्ये फ्यूल इंजेक्शन आणि वेगवेगळे सेन्सर असतात, जे थंड हवेनुसार इंजिनचं काम नियंत्रित करण्यास मदत करतात. त्यामुळे प्रत्येक बाईकला बराच वेळ जागेवर चालू ठेवून गरम करण्याची गरज नसते.
बाईक बराच वेळ उभी राहिल्यावर इंजिनमधील ऑईल हळूहळू खाली जमा होते. थंडीमध्ये इंजिन ऑईल अधिक घट्ट होते आणि त्याचा प्रवाह थोडा मंदावतो. त्यामुळे बाईक सुरू केल्यानंतर इंजिनच्या सर्व भागांपर्यंत ऑईल पोहोचण्यासाठी थोडा वेळ लागतो. हे ऑईल इंजिनच्या भागांना घर्षणापासून वाचवण्याचे काम करते.
बाईक सुरू झाल्यानंतर ऑईल पंप काम करू लागतो आणि इंजिनच्या महत्त्वाच्या भागांपर्यंत ऑईल पोहोचवतो. अशा वेळी लगेच वेगाने बाईक चालवल्यास किंवा अचानक ॲक्सिलरेटर दिल्यास इंजिनवर जास्त ताण येऊ शकतो. त्यामुळे सुरुवातीला थोडा वेळ थांबा आणि त्यानंतर बाईक हळूहळू चालवायला सुरुवात करा.
आधुनिक फ्यूल इंजेक्शन (FI) बाईकमध्ये इंजिनचे तापमान ओळखण्यासाठी सेन्सर आणि इलेक्ट्रॉनिक कंट्रोल युनिट (ECU) असतं. हे तंत्रज्ञान थंडीच्या प्रमाणानुसार इंधनाचा पुरवठा आणि इंजिनचा वेग नियंत्रित करते, त्यामुळे सामान्य थंडीत बाईक सुरू केल्यानंतर ३० सेकंद ते १ मिनिट जागेवर चालू ठेवणं पुरेसं असतं.
जुन्या कार्ब्युरेटर असलेल्या बाईकमध्ये थंडीच्या दिवसांत हवा आणि इंधन यांचं योग्य मिश्रण तयार होण्यास अडचण येऊ शकते. त्यामुळे बाईक सुरू झाल्यानंतर बंद पडू शकते किंवा ॲक्सिलरेटर दिल्यावर झटके बसू शकतात, अशा वेळी बाईक काही वेळ जागेवर चालू ठेवणं फायदेशीर ठरतं.
इंजिन लवकर गरम व्हावे म्हणून वारंवार ॲक्सिलरेटर देऊ नका, तसंच बाईक सुरू होताच वेगाने चालवणं टाळा. इंजिन १० ते १५ मिनिटे जागेवरच चालू ठेवण्याची गरज नसते, कारण त्यामुळे इंधन जास्त खर्च होते आणि प्रदूषणही वाढतं.