Surabhi Jayashree Jagdish
बाईकच्या इंजिनमधून मिळणारी शक्ती चेनच्या मदतीने मागच्या चाकापर्यंत पोहोचते. त्यामुळे चेन व्यवस्थित असणं बाईकच्या चालण्यासाठी महत्त्वाचं आहे. चेनची नियमित स्वच्छता आणि ल्युब्रिकेशन केल्यास तिची झीज कमी होण्यास मदत होते.
चेनला वेळेवर ल्युब्रिकेशन न केल्यास तिच्यातील घर्षण वाढतं. त्यामुळे चेन आणि स्प्रॉकेट लवकर झिजू शकतं. तसंच बाईक चालवताना चेनमधून आवाज येणं आणि चेनचं काम व्यवस्थित न होणं अशा समस्या निर्माण होऊ शकतात.
चेनवर गंज दिसत असेल तर ल्युब्रिकेशनची गरज असू शकते. बाईक चालवताना चेनमधून किरकिर किंवा खडखड असा आवाज येत असेल तर तिची तपासणी करा. चेनवर धूळ, माती किंवा चिकट मळ साचला असेल तरी ती स्वच्छ करून ल्युब्रिकेट करणे गरजेचे आहे.
चेन स्वच्छ करण्यासाठी बाईकसाठी योग्य चेन क्लिनर वापरा. मऊ ब्रशच्या मदतीने चेनवरील धूळ, माती आणि जुने चिकट तेल काढून टाका. त्यानंतर चेन कोरडी होऊ द्या आणि मग त्यावर ल्युब्रिकंट लावा.
बाईकच्या चेनसाठी खास तयार केलेले चेन ल्युब्रिकंट वापरणं योग्य ठरतं. तुमच्या बाईकमध्ये O-ring किंवा X-ring चेन असल्यास त्यासाठी योग्य असलेले ल्युब्रिकंट निवडू शकता.
चेनवर गरजेपेक्षा जास्त ल्युब्रिकंट लावू नका, कारण त्यामुळे धूळ आणि माती चिकटू शकते. ल्युब्रिकंट मागच्या चाकाच्या टायरवर किंवा डिस्क ब्रेकवर पडणार नाही याची काळजी घ्या. चेन स्वच्छ करताना किंवा ल्युब्रिकेट करताना इंजिन बंद ठेवा आणि हात चेनजवळ असताना चाक फिरवू नका.
साधारणपणे प्रत्येक 500 ते 700 किलोमीटरनंतर बाईकची चेन ल्युब्रिकेट करणं योग्य ठरतं. पण पावसात किंवा चिखलाच्या रस्त्यावर बाईक चालवल्यास त्यापूर्वीच चेन स्वच्छ करून ल्युब्रिकेट करावी.