नवले पुलावर कंटेनरचा ब्रेक फेल होऊन भीषण अपघात झाला
८ जणांचा मृत्यू तर १५ जण जखमी झाले
नवलकर कुटुंब नवस फेडून परतताना या दुर्घटनेत मृत्युमुखी पडले
नवले पूल परिसर पुन्हा एकदा ‘डेथ झोन’ म्हणून चर्चेत आला
पुण्यातील नवले पुलावर गुरुवारी म्हणजे १३ नोव्हेंबर रोजी भीषण अपघात झाला. कंटेनरवरचा चालकाचा ताबा सुटल्याने कंटेनर पुढे असलेल्या गाड्यांना धडकला. या भीषण अपघातानंतर या गाडीने पेट घेतला. या दुर्घटनेत ८ जणांचा मृत्यू झाला, तर १५ जण जखमी झाले. मृतांमध्ये एक अख्ख्या कुटुंबाचा समावेश आहे. नवस फेडायला गेलेल्या या कुटुंबावर काळाने घाला घातला. दुर्दैवाची बाब म्हणजे मृतांमध्ये एक ३ वर्षीय चिमुकली देखील होती. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
पुण्यात गुरुवारी संध्याकाळच्या सुमारास भीषण अपघात घडला. पुण्यातील कात्रज बोगदा ओलांडल्या नंतर एका कंटेनर चा ब्रेक फेल झाला आणि चालकाचे वाहनावरचे नियंत्रण सुटल्यामुळे त्याने रस्त्यात येणाऱ्या ८ ते १० वाहनांना धडक दिली. पुढे एका कंटेनरला धडक देण्यापूर्वीच त्याच्या समोर असलेल्या चारचाकी वाहनाला धडक दिल्यामुळे ते वाहन दोन्ही कंटेनरच्या मध्यभागी सापडलं आणि अग्नितांडव झाला.
घटनास्थळी आगीचे लोण दूरपर्यंत पोहचले. तातडीने पोलिसांनी, अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली तर दुसऱ्या बाजूला स्थानिकांकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू होते. मात्र अपघात इतका भयानक होता की मध्यभागी अडकलेल्या चारचाकीचा चक्काचूर झाला होता. या चार चाकी गाडीत एक ड्राइव्हर मित्र,आई, वडील, मुलगी, आणि एका चिमुकलीचा समावेश होता.
कुटुंबातील मृतांची नावे स्वाती संतोष नवलकर (मुलगी), शांता दाभाडे (आई ) आणि दत्तात्रय दाभाडे (वडील) असे आहे. स्वाती आणि त्यांचे कुटुंब आपल्या लहान मुलीचा वाढदिवस आणि आजारी वडिलांचा नवस पूर्ण करण्यासाठी नारायणपूर दत्त मंदिरात परिवारासह गेल्या होत्या. वडिलांना तीन वर्षांपासून गंभीर आजार होता,त्यातून बरे व्हावेत म्हणून पाच गुरुवारांचा नवस त्यांनी केला होता. दुर्दैवाने, नवसाचा हा शेवटचा गुरुवारच शेवटचा ठरला.
दर्शन करून परतीच्या प्रवासाला निघालेल्या नवलकर कुटुंबावर घरापासून अवघ्या दहा मिनिटांच्या अंतरावर काळाने घाला घातला. मुंबई–बंगळूर महामार्गावरील नवले पुलाजवळ त्यांच्या कारला भरधाव कंटेनरने जबर धडक दिली.त्यात या कुटुंबाचा मृत्य झाला. या कुटुंबासोबतच मृत स्वाती यांच्या मैत्रिणीची ३ वर्षीय मुलगी देखील होती. या घटनेत तिचा देखील मृत्यू झाला आहे. हा अपघात इतका भीषण होता की ८ जणांचा निष्पाप बळी गेला, तर १५ जण जखमी झाले आहेत. दरम्यान शासनाकडून अपघातग्रस्तांना ५ लाखाची मदत जाहीर करण्यात आली आहे. पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील नवले पूल परिसर मागील पाच वर्षांत शहरातील सर्वात धोकादायक ठिकाण बनला आहे. सतत घडणाऱ्या अपघातांमुळे हा भाग डेथ झोन’ बनला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.