अजय सरोदेने बनावट कागदपत्रे वापरून शस्त्र परवाना घेतला
दलाल निलेश फाटकने १५ जणांना खोट्या परवान्यांची मदत केल्याचा खुलासा
सरोदेच्या घरातून ४०० काडतुसे जप्त
पोलिसांनी सर्व परवाना फाईल्स मागवून तपास गतीमान केला
कोथरूड गोळीबार प्रकरणातील आरोपी कुख्यात गुंड नीलेश घायवळ याचा साथीदार अजय सरोदे याने बनावट कागदपत्रांद्वारे रहिवासी पुरावा, तसेच प्रतिज्ञापत्र सादर करून पुणे पोलिसांकडून शस्त्र बाळगण्याचा परवाना मिळविल्याचे तपासात उघडकीस आले होते. याप्रकरणी सरोदे याच्यासह शस्त्र परवाना मिळवून देण्यासाठी काम करणाऱ्या दलालाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. अशातच आता या दलालाने आणखी १५ पिस्तूल परवाने मिळवून दिले असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
निलेश घायवळ टोळीतील गुंडांनी १७ सप्टेंबर रोजी कोथरूडमधील शास्त्रीनगर परिसरात एका तरुणावर गोळी झाडली होती. या प्रकरणात सरोदे याला अटक करण्यात आली होती. तपासात सरोदे याच्याकडे शस्त्र परवाना असल्याचे उघडकीस आले होते. त्याने परवाना मिळवण्यासाठी येरवडा पोलीस ठाण्यात अर्ज केला होता. त्यासाठी त्याने येरवडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत वास्तव्यास असल्याची बनावट कागदपत्रे सादर केली होती. सरोदे याला पुणे पोलिसांकडून २९ जानेवारी २०२४ रोजी शस्त्र परवाना देण्यात आला होता. सरोदे याच्याविरुद्ध यापूर्वी दोन गुन्हे दाखल झाले होते. या प्रकरणाचा तपास करण्याचे आदेश पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले होते.
याबाबत पोलिसांचे पथक येरवडा परिसरात गेले. सरोदे याने दिलेला पत्ता अस्तित्वात नसल्याचे उघड केले. सराेदे याने त्याच्यावर दाखल असलेल्या गुन्ह्यांची माहिती पोलिसांना दिली नव्हती. बनावट पत्ता, तसेच प्रतिज्ञापत्र सादर करून दिशाभूल केल्याप्रकरणी सरोदे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला’, अशी माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली.
तपासादरम्यान सरवदेच्या घरावर टाकलेल्या छाप्यात पोलिसांना चारशे काडतुसे सापडली. त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत खोट्या कागदपत्रांच्या आधारे परवाना देणारा एजंट निलेश फाटकबद्दल गुप्त माहिती शोधून काढली. चौकशीदरम्यान या एजंटने आणखी १५ जणांना खोट्या कागदपत्रांच्या आधारे शस्त्रांचा परवाना दिला असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे.
याप्रकरणी फाटक याच्याविरुद्ध कोथरूड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवाय फाटक याने परवाने मिळवून दिलेल्या त्या १५ जणांची यादी तयार करण्यात आली असून त्यांच्या परवान्यांच्या फाईल्स तपासासाठी मागविण्यात आल्या आहेत. निलेश घायवळ प्रकरणी उलगडत जाणाऱ्या सविस्तर माहितीमुळे घायवळयाचा पाय आणखी खोलात जाण्याची शक्यता आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.