पुणे हिट अँड रन प्रकरणामुळे (Pune Hit And Run Case) सर्वच राजकीय पक्ष आक्रमक झाले आहे. याप्रकरणातील आरोपी कारचालक आणि त्याच्या पालकांविरोधात कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी या राजकीय पक्षांनी केली आहे. अशामध्ये या प्रकरणात एक महत्वाची अपडेट समोर आली आहे. याप्रकरणातील आरोपी अल्पवयीन कारचालक दारु प्यायला होता की नाही? याचा रिपोर्ट येण्यासाठी आठ दिवसाचा कालावधी लागणार आहे. पुण्याच्या वरीष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली आहे.
पोलिस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, 'आरोपी अल्पवयीन मुलाच्या रक्ताचे नमुने तपासाणीसाठी पाठवण्यात आले आहेत. सरकारी न्याय वैद्यकीय प्रयोग शाळेत हे नमुने पाठवण्यात आले आहेत. त्याचा रिपोर्ट यायला आठ दिवस लागणार आहे. रिपोर्ट लवकर मिळावा यासाठी पुणे पोलिस प्रयत्नशील आहेत. रिपोर्ट अभावी आरोपीला न्यायालयात फायदा होण्याची शक्यता आहे. आरोपीला आधीच कनिष्ठ न्यायालयात जामीन मिळाला आहे. याविरोधात पुणे पोलिस सत्र न्यायालयात दाद मागणार आहेत. अल्पवयीन आरोपीने कोर्टासमोर तो नियमीत मद्य सेवन करत असल्याचे मान्य केले आहे.'
पुण्यातील महायुतीचे लोकसभा उमेदवार मुरलीधर मोहोळ याच्यासह महायुती मधील घटक पक्षातील नेत्यांनी पुणे हिट अँड रन प्रकरणी पुणे पोलिस आयुक्तांची भेट घेतली. आरोपीवर तत्सम कलम लावली नाहीत असे बोलले जात होते. त्यामुळे त्याच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे. तसंच, पालकांवर पण गुन्हा दाखल करावा, अशी मागणी त्यांनी केली. अल्पवयीन मुलांबाबत पब आणि बार याच्याबाबत नियमावली द्यावी. पब आणि बार याच्या वेळा बदल करण्यात याव्या, कायदा सुव्यवस्थेबाबत कारवाई करण्यात यावी, अशी देखील मागणी त्यांनी केली. तसंच, 'इथ येण्यापूर्वी गृहमंत्री यांच्याशी बोलण झालं. त्यांना सर्व माहिती दिली आहे. राजकीय दबावाला बळी पडू नये असे आयुक्तांना सागितले आहे. राजकीय हस्तक्षेप चालणार नाही असे ही सांगितले आहे.'
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नेत्या रुपाली पाटील यांनी सांगितले की, महायुती पदाधिकारी म्हणून आम्ही पोलिस आयुक्तांची भेट घेतली. पुण्यातील पब संस्कृती बंद झाली पाहिजे. ही बाब गंभीर आहे. एका मुलाचा- मुलीचा मृत्यू होतो हे वाईट आहे. पालकांनी लक्ष दिलं पाहिजे. त्यात पोलिसांनी अल्पवयीन मुलांना पबमध्ये जाऊ नये यासाठी काय नियमावली आहे हे पाहावं. पोलिसांनी केलेल्या कारवाई व्यतिरिक्त अजून कडक कारवाई करू असं पोलिस आयुक्त यांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे.'
पुण्यातील युवक काँग्रेसचे अध्यक्ष अक्षय जैन यांनी सांगितले की, 'पुण्यात बार संस्कृती वाढत आहे. पुणे पोलिसांकडे आम्ही गेल्या वर्षभरात किती पब आणि बारवर कारवाई केली ही माहिती विचारली. तर त्यांच्याकडे खूप अल्प आकडेवारी उपलब्ध आहे. असेच जर पब आणि बार सुरू राहिले तर आम्ही हे चालू देणार नाही. ज्याप्रमाणे बारमध्ये अल्पवयीन मुलांना दारू दिली जाते त्या भवानी बारची आम्ही तोडफोड करू.
पुण्यातील मनसे नेते साईनाथ बाबर यांनी सांगितले की, 'पुणे शहरांमध्ये बऱ्याच ठिकाणी ज्यांना कुठली परवानगी नसतानासुद्धा बार आणि पब रात्री उशीरापर्यंत आणि पहाटेपर्यंत सुरू असतात. त्याबद्दलची तक्रार आम्ही केलेली आहे. याप्रकरणी सकल चौकशी व्हावी, आरोपीच्या वडिलांवर गुन्हा दाखल व्हावा, वडिलांनी त्याला जी गाडी दिली त्याच्यावर कारवाई व्हावी, 17 वर्षांचा मुलगा आहे त्याला गाडी कशी दिली, १७ वर्षांच्या मुलाला पबमध्ये घेतले कसे, त्याला दारू कशी दिली? असे अनेक प्रश्न आहेत. त्या पबवर गंभीर गुन्हा दाखल करून तो पब सील करावा. आरपीला जामीन मिळाला आहे त्यासंदर्भात पोलिसांनी कडक कारवाई करावी.'
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.