PUNE COLLEGE ADMISSION FRAUD saam tv
मुंबई/पुणे

टॉप कॉलेजमध्ये अ‍ॅडमिशन पक्क म्हणत पालकांना गंडा; पुण्यातील 2 बोगस कॉल सेंटरचा पर्दाफाश

Fake College Admission Call Centre Scam In Pune: नामांकित कॉलेजमध्ये प्रवेश मिळवून देण्याचे आमिष दाखवून पालक-विद्यार्थ्यांची लाखोंची फसवणूक करणाऱ्या टोळीचा पवई पोलिसांनी पर्दाफाश केला.

Omkar Sonawane

संजय गडदे, साम टीव्ही

नामांकित अभियांत्रिकी व उच्च शिक्षण संस्थांमध्ये प्रवेश मिळवून देण्याचे आमिष दाखवून पालक आणि विद्यार्थ्यांची लाखो रुपयांची फसवणूक करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा पवई पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. पुण्यातील विमाननगर आणि खराडी परिसरात सुरू असलेल्या दोन बोगस कॉल सेंटरवर छापा टाकून पोलिसांनी १० आरोपींना अटक केली. या कारवाईत १ कोटी ३५ लाख २३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, फसवणुकीसाठी वापरण्यात आलेल्या बँक खात्यांमधील २४ लाख रुपये गोठवण्यात आले आहेत. पोलिसांच्या तपासात आरोपी २०२४ पासून अशाच प्रकारे पालक व विद्यार्थ्यांना लक्ष्य करून फसवणूक करत असल्याचे समोर आले आहे. या टोळीचे जाळे महाराष्ट्रासह उत्तर प्रदेश, कर्नाटक आणि गुजरातपर्यंत पसरले असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.

इन्स्टाग्रामवरील जाहिरातीद्वारे पालकांना हेरले

पवई परिसरातील ४३ वर्षीय महिलेच्या मुलाला हैदराबाद येथील 'IIHT' या संस्थेत प्रवेश मिळवून देण्याचे आमिष दाखवण्यात आले होते. इन्स्टाग्रामवरील 'techorbit1111' या अकाउंटद्वारे गौतम आणि सुमीत नावाच्या व्यक्तींनी तक्रारदारांशी संपर्क साधला. प्रवेश निश्चित करून देण्याचे आश्वासन देत आरोपींनी त्यांच्याकडून १६ लाख ५० हजार रुपये घेतले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने पवई पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. याप्रकरणी १३ ऑगस्ट २०२६ रोजी गुन्हा क्रमांक ९६१/२०२६ नोंदवण्यात आला.

मोबाईलच्या लोकेशनवरून पुण्यात छापा

गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांनी तांत्रिक तपासाची मदत घेतली. फसवणुकीच्या रकमेतून खरेदी करण्यात आलेल्या मोबाईलचे लोकेशन शोधून पोलिसांनी पुण्यातील आरोपींपर्यंत मजल मारली. १४ ऑगस्ट रोजी पवई पोलिसांच्या पथकाने पुण्यात कारवाई करून सुरुवातीला सहा आरोपींना ताब्यात घेतले. चौकशीत आरोपी पुण्यात दोन स्वतंत्र बोगस कॉल सेंटर चालवत असल्याचे उघड झाले. त्यानंतर या दोन्ही ठिकाणी छापे टाकण्यात आले.

पोलिसांनी कारवाई केलेली ठिकाणे :

- निऑन होम्स, रूम क्रमांक २०४, ४०४ आणि ६०३, विमाननगर, लोहगाव, पुणे.

- ऑफिस क्रमांक १२, तिसरा मजला, सिटी विस्ता बिल्डिंग, खराडी, पुणे.

BMWसह २२ मोबाईल, लॅपटॉप आणि हार्ड डिस्क जप्त

पोलिसांनी आरोपींकडून २२ मोबाईल, २३ सिमकार्ड, दोन लॅपटॉप, दोन हार्ड डिस्क, तीन डेबिट कार्ड, एक जिओबुक तसेच दोन वाहने जप्त केली आहेत. यामध्ये एका BMW कारचाही समावेश आहे. जप्त मुद्देमालाची एकूण किंमत १ कोटी ३५ लाख २३ हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. याशिवाय फसवणुकीच्या व्यवहारांसाठी वापरण्यात आलेल्या बँक खात्यांमधील २४ लाख रुपये फ्रीज करण्यात आले आहेत.

अशी होती फसवणुकीची पद्धत

इंजिनिअरिंग महाविद्यालयांच्या प्रवेशाचा काळ लक्षात घेऊन आरोपी सोशल मीडियावर जाहिराती करत होते. प्रवेशासाठी उत्सुक असलेल्या पालक आणि विद्यार्थ्यांशी इन्स्टाग्राम, व्हॉट्सॲपच्या माध्यमातून संपर्क साधला जात असे. आरोपी संबंधित कॉलेजच्या प्रशासनात आपली ओळख असल्याचे भासवत. काही वेळा पालकांना कॉलेजच्या कॅम्पस किंवा परिसरात भेटून प्रवेश निश्चित झाल्याचा विश्वास दिला जात असे. त्यानंतर टोकन अमाऊंट, ॲडव्हान्स किंवा पहिल्या वर्षाची फी अशा विविध कारणांखाली मोठ्या रकमा उकळल्या जात होत्या.

PICT, NSUT, DTUसह अनेक कॉलेजची यादी सापडली

पंचनाम्यादरम्यान पोलिसांना आरोपींकडे सुमारे ३० मोबाईल क्रमांकांची यादी आढळली. तसेच पुण्यातील PICT, दिल्लीतील NSUT आणि DTU यांसारख्या नामांकित अभियांत्रिकी संस्थांची यादीही पोलिसांच्या हाती लागली आहे. त्यामुळे या टोळीने आणखी किती पालक आणि विद्यार्थ्यांना गंडा घातला आहे, तसेच किती गुन्हे केले आहेत, याचा तपास सुरू आहे. या कारवाईमुळे आणखी मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

विविध राज्यांतील सहा गुन्हे उघड

अटक आरोपींच्या चौकशीत आतापर्यंत महाराष्ट्रातील मुंबई आणि नागपूर, उत्तर प्रदेश, कर्नाटक आणि गुजरात या राज्यांमधील एकूण सहा गुन्हे उघडकीस आले आहेत. आरोपींना १५ ऑगस्ट रोजी न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्यांना २० ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या टोळीच्या आर्थिक व्यवहारांचा, सोशल मीडिया अकाउंटचा, बँक खात्यांचा तसेच इतर साथीदारांचा पोलीस तपास करत आहेत.

वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई

पोलीस आयुक्त देवेन भारती, सह पोलीस आयुक्त (कायदा व सुव्यवस्था) सत्यनारायण चौधरी, अपर पोलीस आयुक्त (पश्चिम प्रादेशिक विभाग) अभिनव देशमुख, पोलीस उपआयुक्त (परिमंडळ १०) दत्ता नलावडे, सहायक पोलीस आयुक्त (साकीनाका विभाग) दादासाहेब गुटुकडे आणि पवई पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आत्माजी सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. तपास पथकात पोलीस निरीक्षक सुशांत वडगर, पोलीस निरीक्षक जयदीप गोसावी, सायबर अधिकारी पोलीस उपनिरीक्षक प्रशांत केंद्र, पोलीस उपनिरीक्षक सागर जाधव यांच्यासह पोलीस हवालदार मुत्तार, पिसाळ, पोलीस शिपाई घाडगे, राठोड, शिंभाट आणि महिला पोलीस शिपाई येवले यांचा समावेश होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bigg Boss 20: बादशाहसोबत डिव्होर्सनंतर ईशा रिखीची 'बिग बॉस २०'मध्ये एन्ट्री; म्हणाली, 'प्रेक्षकांना लवकरच सत्य...'

जेएनयूच्या प्राध्यापकावर लैंगिक छळाचा आरोप, 11विद्यार्थ्यांच्या तक्रारीने खळबळ

नगरपालिका-नगरपंचायतींसाठी महत्त्वाची अपडेट! नगराध्यक्षांच्या सहीचा अधिकार रद्द

मधुचंद्राच्या रात्रीत पान का खायला दिलं जातं? कोणालाच माहिती नाहीये हे भन्नाट कारण?

Bigg Boss 20: बिग बॉस २०साठी सलमान खानची फी किती? जाणून घ्या यंदाच्या सीझनमध्ये काय आहे खास

SCROLL FOR NEXT