कांदिवली पूर्व परिसरातून चोरीची घटना उघडकीस आली आहे. पोलिसांनी या टोळीचा पर्दाफाश केला करत एक - दोन नाही तर तब्बल १३ आरोपींना अटक केली आहे. कांदिवली पूर्व परिसरात MTNL कंपनीच्या भूमिगत दूरसंचार केबल चोरी करणाऱ्या टोळीचा समतानगर पोलिंसानी पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी धडक कारवाई करत आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. गुन्ह्यात वापरण्यात आलेला २० लाखांचा JCB आणि ८० हजारांचे दोन मोबाईल फोन , असा एकून २० लाख ८० हजारांचा मुद्देमाल पोलिंसानी जप्त केला आहे .
समतानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अशोक नगर क्रॉस रोड क्रमांक 4, कांदिवली पूर्व येथे MTNL कंपनीची भूमिगत केबल चोरीला गेल्याची घटना 22 जून 2026 रोजी घडली होती. या घटनेत 153 मीटर लांबीच्या 2000 पेअरच्या चार केबल, ज्यांची किंमत सुमारे 9 लाख 500 रुपये होती, त्या चोरीला गेल्या होत्या.
या प्रकरणी MTNLचे समतानगर येथील व्यवस्थापक विरेंद्र ललताप्रसाद यादव (वय 52) यांनी समतानगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. त्यानुसार गुन्हा क्रमांक 806/2026 अन्वये BNS कलम 303(2), 324(5), 3(5), दूरसंचार अधिनियम 2023 चे कलम 42 तसेच सार्वजनिक मालमत्ता नुकसान प्रतिबंधक अधिनियम 1984 चे कलम 3 अंतर्गत अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
तांत्रिक माहिती आणि उपलब्ध पुराव्यांच्या आधारे काही दिवसातच पोलिंसाना आरोपींचा पाठलाग करण्यात मदत मिळाली. तपासात स्वप्निल अनिल शेलार, सुरेश शिवाजी शिंदे, प्रथमेश दत्तात्रे मालवणकर, सागर नैशिल कांबळे, साहिल शकिल साह, अब्दुल सिध्दीक अहमद शेख, रिझवान मेहताब मलीक, मो. अफजल हसन खान, सुरज उर्फ साहिल दिलावर कालेकर, मनोजकुमार शहब्दिन गुप्ता, मुबारक अली नबीजान अली शहा, आझम अब्दुल गफार खान आणि अब्दुल वहाब सादिक मिया अन्सारी या 13 आरोपींची नावे समोर आली आहेत. आरोपींकडून गुन्हा करताना वापरण्यात आलेला JCB तसेच दोन मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहेत. या प्रकरणातील आणखी आरोपींचा शोध सुरू असून पुढील तपास सुरू आहे.
ही कारवाई अपर पोलीस आयुक्त, उत्तर प्रादेशिक विभाग शशिकुमार मीना, पोलीस उपआयुक्त, उत्तर परिमंडळ-3 गजानन शिवलिंग राजमाने आणि सहाय्यक पोलीस आयुक्त, समतानगर विभाग कैलास बर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयवंत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक (गुन्हे) अजितसिंग राजपूत, सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश राऊत, स.फौ. रोजश तोंडवाळकर, पोलीस हवालदार जयेश केणी, पोलीस हवालदार अतुल ननावरे, पोलीस शिपाई दौलत साळुंके आणि पोलीस शिपाई निलेश भिकले यांनी ही कडक कारवाई केली आहे.