पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रूग्णालय प्रशासनाने पैशांच्या हव्यासापोटी उपचारात अडवणूक केल्याने तनिषा भिसे या गर्भवती महिलेचा मृत्यू झाला. या संपूर्ण घटनेनंतर चहूबाजूने रोष व्यक्त करण्यात आला. शिवसैनिकांनी रस्त्यावर उतरून रूग्णालयविरोधात निषेध व्यक्त केला. अशातच रूग्णालयाचे वैद्यकीय संचालक धनंजय केळकर यांनी एक परिपत्रक जारी केलं. या परिपत्रकात त्यांनी स्पष्टीकरण देत भावनिक प्रतिक्रिया व्यक्त केल्या. तसेच, इमर्जन्सी रूग्णांकडून कोणतीही अनामत रक्कम न घेण्याचा निर्णय मॅनेजमेंट आणि विश्वस्त मंडळाने घेतल्याची महत्त्वाची घोषणा त्यांनी केली.
परिपत्रकात डॉ. केळकर काय म्हणाले?
"दीनानाथ मंगेश्कर हॉस्पिटल सुरू झाल्यापासून आमचं ध्येय गरजू आणि गरीब रूग्णांना योग्य वैद्यकीय सेवा देणं हेच राहिलं आहे. मात्र, कालचा दिवस हा हॉस्पिटलच्या इतिहासातील अत्यंत वेदनादायी आणि सुन्न करणारा दिवस होता", असं आपल्या पत्रात त्यांनी नमूद केलं.
मान शरमेने खाली
"एका रूग्णाच्या मृत्यूनंतर मोर्चामधील संतप्त जमावाने पब्लिक रिलेशन ऑफिसरवर चिल्लर फेकले. महिला कार्यकर्त्यांनी डॉक्टर घैसासच्या यांच्या आई-वडिलांच्या रूग्णालयाची तोडफोड केली. काही संघटनेच्या लोकांनी लता मंगेशकर आणि दीनानाथ मंगेशकर यांच्या फोटोवर काळे फासले. हे सगळं पाहून आमची मान शरमेने खाली गेली आहे. लता मंगेशकर यांना मानणाऱ्या लाखो लोकांच्या मनावर काय परिणाम झाला असेल, देव जाणे", अशा भावना केळकरांनी व्यक्त केल्या.
स्वत:हून मदतीचा हात पुढे
डॉ. केळकरांनी स्पष्ट केलं की, "रूग्णाच्या नातेवाईकांना आम्ही स्वत: सांगितलं होतं की, तुम्हाला जमेल तेवढीच रक्कम भरा, बाकीची मदत हॉस्पिटल करेल. असे सांगितलेले असतानाही कुणालाही न कळवता ते तेथून निघून गेले", असं त्यांनी स्पष्ट केलं.
आता इमर्जन्सी रूग्णांकडून डिपॉझिट नाही
"दिनानाथ रुग्णालय इमर्जन्सीमधील कुठल्याही पेशंटकडून, मग तो इमर्जन्सी रूममध्ये आलेला असो किंवा डिलिव्हरीच्या डिपार्टमेंट आलेला असो, अथवा लहान मुलांच्या विभागातला असो त्यांच्याकडून अनामत रक्कम घेतले जाणार नाही. विश्वस्त मंडळ आणि मॅनेजमेंटच्या बैठकीत एकमताने निर्णय घेण्यात आला आहे. आजपासून त्याची अंमलबजावणी सुरू होईल", असंही धनंजय केळकर यांनी जारी केलेल्या परिपत्रकात स्पष्ट केलं.
सत्य बाहेर येईल
"घटनेचा शासकीय चौकशीद्वारे तपास होणार आहे. तपास झाल्यानंतर सत्य बाहेर येईल. परंतु या निमित्ताने या असंवेदनशीलतेचा अंत करण्याची आम्ही सुरुवात करीत आहोत, याची मुख्यमंत्र्यांनी नोंद घ्यावी", असं पत्रात केळकरांनी नमूद केलं.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.