पुण्यातील चंदननगर परिसरात प्रियकराने प्रेयसीवर चाकूने हल्ला केला
२२ वर्षीय तरुणीचा उपचारादरम्यान मृत्यू
प्रेमसंबंध आणि लग्नाच्या वादातून ही घटना घडली
आरोपीला पोलिसांनी अटक केली
सागर आव्हाड, पुणे
पुण्यातील चंदननगर परिसरात धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रियकराने प्रेयसीच्या गळ्यावर चाकूने सपासप वार केल्याने ती गंभीर जखमी झाली होती. दरम्यान या २२ वर्षीय तरुणीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. प्रेमप्रकरणातून ही हत्या केल्याचे उघडकीस आले आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांनी आरोपी प्रियकराला अटक केली आहे. उजालादेवी दोहरे असे मृत तरुणीचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी दिलीप राठोड आणि उजालादेवी दोहरे हे दोघेही पुण्यातील एका नामांकित मॉलमध्ये काम करत होते. कामाच्या ठिकाणी त्यांची ओळख झाली होती. काही दिवसांतच या ओळखीचे रूपांतर मैत्रीत झाले आणि पुढे दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले. मात्र काही दिवसांपूर्वी उजालादेवी तिच्या मूळ गावी गेली होती. त्यावेळी तिच्या कुटुंबीयांनी तिचे लग्न दुसऱ्या मुलाशी ठरवले.
तरुणीने ही माहिती दिलीप राठोड याला दिल्यानंतर तो संतापला होता. पोलिसांच्या माहितीनुसार, हे लग्न त्याला मान्य नव्हते. याच रागातून त्याने टोकाचे पाऊल उचलल्याचे समोर आले आहे. २९ एप्रिल रोजी रात्री सुमारे ८ वाजण्याच्या सुमारास आरोपी थेट तरुणीच्या चंदननगर येथील घरात घुसला. त्यानंतर दोघांमध्ये वाद झाला आणि संतापाच्या भरात दिलीपने तरुणीच्या गळ्यावर आणि शरीरावर चाकूने सपासप वार केले.
या हल्ल्यात उजालादेवी गंभीर जखमी झाली होती. कुटुंबीयांनी तिला तातडीने रुग्णालयात दाखल केले. गेल्या काही दिवसांपासून तिच्यावर उपचार सुरू होते. मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. तरुणीच्या मृत्यूनंतर कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या प्रकरणी चंदननगर पोलिस ठाण्यात तरुणीच्या नातेवाईकांनी फिर्याद दिली होती. त्यानंतर पोलिसांनी आरोपी दिलीप राठोड याच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेतले. न्यायालयाने आरोपीला ७ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली असून पुढील तपास चंदननगर पोलीस करत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.