सुशांत सावंत, मुंबई
मुंबई: मुंबई जिल्हा बॅंकेतील तथाकथित गैरव्यवहाराप्रकरणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांच्यावर महाविकास आघाडीमधील नेत्यांकडून सातत्याने आरोप सुरु आहेत. दरेकर मजूर नसताना त्यांनी मजूर प्रवर्गातून मुंबई जिल्हा बॅंकेतील (Mumbai District Central Co-operative Bank Ltd) निवडणुकीसाठी अर्ज दाखल केला असा आरोप त्याच्यावर होत आहे. याबाबत आता दरेकरांनी (Pravin Darekar) प्रत्युत्तर दिलं आहे. प्रविण दरेकरांनी मुंबई कॉंग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप (Bhai Jagtap) यांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे. यात भाई जगताप यांनी लेखी माफी न मागितल्यास त्यांच्याविरोधात १०० कोटींचा अब्रूनुकसानीचा दावा दाखल (Defamation suit) करण्यात येईल असा इशारा देण्याता आला आहे. (pravin darekar send a Defamation notice to bhai jagtap in mumbai bank case)
हे देखील पहा -
या नोटीशीत लिहिलंय की, मुंबई जिल्हा मध्यवर्ती जिल्हा बँकेच्या कथित गैरव्यवहाराप्रकरणी केलेले वक्तव्य तथ्यहीन, निराधार व सबळ पुराव्याशिवाय तसेच कोणतीही शहानिशा न करता केलेले आहे. यामुळे समाजातील माझी प्रतिमा मलिन झाली आहे. दरेकर यांच्याविरोधातील वक्तव्याप्रकरणी भाई जगताप यांनी ७ दिवसांच्या आतमध्ये त्यांची लेखी माफी मागितली नाही तर जगताप यांच्याविरोधात १०० कोटींचा अब्रुनुकसानीची दावा दाखल करण्यात येईल व त्यांच्या विरोधात फौजदारी खटला दाखल करण्यात येणार असल्याची माहिती अँड. अखिलेश चौबे यांनी दिली.
विरोधी पक्ष नेते दरेकर यांचे वकील अँड. अखिलेश चौबे यांच्यामार्फत भाई जगताप यांना आज कायदेशीर नोटीस पाठविण्यात आली आहे. सदर नोटीशीत नमूद करण्यात आले आहे की, दरेकर गेली २० वर्षे मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक आहेत. यापैकी तसेच १२ वर्षे बँकेचे अध्यक्ष होते. या काळात बँकेला एक उंचीवर नेऊन ठेवण्याचे काम दरेकर यांनी केले. नाबार्ड यांनी बँकेच्या कामगिरीची दखल घेऊन तसे प्रशस्तीपत्रक देखील मुंबई बँकेला दिले आहे. असे असतानाही भाई जगताप यांनी कोणतीही घटनांची खातरजमा न करता माझ्याविरोधात केवळ राजकीय सूडबूध्दीने व राजकीय कारणांमुळे बदनामीकारक वक्तव्य केली. जगताप यांनी फक्त दरेकर यांचीच नव्हे तर लाखो ठेवीदारांच्या ठेवी असलेल्या मुंबई बँकेच्या खातेधारकांचीही आपल्या निराधार वक्तव्यांच्या माध्यमातून विनाकारण नाहक बदनामी केले आहे. जगताप याच्या निराधार वक्तव्यामुळे दरेकर यांची समाजात बदनामी झाली आहे असेही अँड. अखिलेश चौबे यांनी जगताप यांना पाठविलेल्या नोटीशीत नमूद करण्यात आले आहे.
जगताप यांनी या वक्तव्याप्रकरणी सात दिवसाच्या आतमध्ये लेखी माफी न मागितल्यास त्यांच्या विरोधात १०० कोटींचा अब्रूनुकसानीचा दावा दाखल करण्यात येईल. भाई जगताप यांनी प्रविण दरेकर यांच्याविरोधात मानहानीकारक वक्तव्य करून दूरचित्रवाणी, प्रसारमाध्यमांमार्फत समाजताच तसेच सहकार व राजकीय क्षेत्रात दरेकर यांची प्रतिमा मलिन केली आहे. असेही सदर नोटीशीत मांडण्यात आले आहे.
गेली २० वर्षे मुंबई जिल्हा बँकेचे मजूर असल्याचा खोटा बनाव करून मुंबई बँकेवर अध्यक्ष म्हणून निवडून येणारे आणि मुंबई बँकेमध्ये २ हजार कोटी रुपयांचा भ्रष्टाचार करणारे भाजपचे आमदार आणि विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर हे आज आपला भ्रष्टाचार, आपले पितळ संपूर्ण जगासमोर उघडे पडल्यावर सावपणाचा आव आणून ट्वीटरच्या माध्यमातून माझ्यावर अब्रूनुकसानीचा दावा ठोकण्याची भाषा करत आहेत. त्यांच्यात जर हिम्मत असेल तर त्यांनी अब्रूनुकसानीचा दावा ठोकून दाखवावा, असे खुले आव्हान भाई जगताप यांनी दरेकर यांना काही दिवसांपूर्वी एका पत्रकार परिषदेत दिले होते, त्याचा उल्लेखही या नोटीशीमध्ये करण्यात आला आहे.
मुंबई बॅंकेतील घोटाळ्याप्रकरणी प्रविण दरेकर यांनी राजीनामा द्यावा तसेच त्यांची ईडी व आयकर विभागामार्फत चौकशी करण्यात यावी, अशी तथ्यहीन वक्तव्ये कोणत्याही सबळ पुराव्याशिवाय करून जगताप यांनी दरेकर यांना मानसिक त्रासदेखील केला आहे, असे नोटीशीत दरेकर यांनी नमूद केले आहे.
Edited By - Akshay Baisane
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.