पनवेलच्या गाडेश्वर धरण परिसरात ओढ्यात बुडून दोन मित्रांचा मृत्यू
मुसळधार पावसामुळे ओढ्यातील पाण्याचा प्रवाह अचानक वाढला
उरणमधील जेएनपीए बंदरात कंटेनर अपघातात एका कामगाराचा मृत्यू, दोन जखमी.
मुंबईसह राज्यातील अनेक भागांत मुसळधार पावसामुळे रेड अलर्ट
राज्यात सर्वत्र पावसाच्या मुसळधारा सुरु आहेत. हवामान विभागाने मुंबईला रेड अलर्ट दिला असून पुढील काही तास महत्त्वाचे असल्याचं म्हटलं आहे. या मुसळधार पावसाचा आनंद नागरिक लुटताना पाहायला मिळत आहेत. दरम्यान या मुसळधार पावसात पनवेल तालुक्यातील गाडेश्वर धरण परिसरात रविवारी दुर्दैवी घटना घडली. या घटनेत दोन तरुणांचा ओढ्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. माथेरान डोंगररांगांमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे ओढ्यातील पाण्याचा प्रवाह अचानक वाढल्याने ही दुर्घटना घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून मृत तरुणांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सुमित पवार आणि नयन म्हात्रे हे दोघे मित्र रविवारी गाडेश्वर धरण परिसरातील ओढ्यात पोहण्यासाठी उतरले होते. दोघेही पनवेलमधील बिचुंबे गावचे रहिवासी होते. सुरुवातीला पाण्याचा प्रवाह सामान्य वाटत असला तरी माथेरान परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे ओढ्यात अचानक मोठ्या प्रमाणात पाणी आले. त्यामुळे पाण्याचा वेग वाढला आणि दोन्ही तरुण त्यात अडकले. घटनास्थळी उपस्थित असलेल्या काही नागरिकांनी त्यांना वाचवण्यासाठी धाव घेतली. काठीच्या साहाय्याने दोघांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र पाण्याचा वेग प्रचंड असल्याने बचावकार्याला यश आले नाही.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस, आपत्ती व्यवस्थापन पथक आणि बचाव पथके तातडीने घटनास्थळी दाखल झाली. शोधमोहीम सुरू करण्यात आल्यानंतर एका तरुणाचा मृतदेह हाती लागला आहे. मात्र दुसरा तरुण अद्याप बेपत्ता असून त्याचा शोध घेण्यासाठी पोलीस आणि बचाव पथकांकडून सर्च ऑपरेशन सुरू आहे. दरम्यान, पावसाळ्यात धरणे, धबधबे आणि ओढ्यांच्या परिसरात पर्यटनासाठी किंवा पोहण्यासाठी जाणाऱ्या नागरिकांनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
उरणमध्ये चक्री वादळामुळे जेएनपीए बंदरातील न्हावा शेवा फिपोर्ट टर्मिनलला फटका बसला असून जहाजावरील कंटेनर उडाल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. या अपघातात टँकरवर काम करणारे तीन कामगार जखमी झाले असून एक कामगार दगावला असल्याची माहिती समोर येत आहे तर दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे. एवढी मोठी घटना घडल्या नंतरही आपत्ती व्यवस्थापन तसेच इतर सुविधा उपलब्ध न झाल्याने कामगार वर्गात नैराश्ययाचे वातावरण पसरले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.