मिताली मठकर, साम टीव्ही
मी मुंबईकर
दररोज सकाळी उठतो आणि पाठीवर बॅग टाकून कामाला निघतो. तीच धावपळ..तीच दगदग...लोकल पकडण्यासाठी जीवाचा आकांत . डब्यात शिरता आलं तरी आमच्यासाठी जग जिंकल्यासारखं ..आज आमच्यातल्याच ४ जणांचा गाडीतून पडून मृत्यू झाला. पण मला काय त्याचं? मला माझं ऑफीस गाठायचं. मला याचंच समाधान आहे की मरणाऱ्यांमध्ये मी नव्हतो..कारण मी डब्याच्या आत होतो. मोबाईलमध्ये मश्गुल होतो.
हा...बातमी समजली तेव्हा मीही थोडासा संताप व्यक्त केला पण तोही मनातल्या मनात...कारण माझ्या संवेदना गोठल्यात .. इतकी मोठी घटना घडूनही मला ना संताप व्यक्त करावासा वाटला, ना मी निषेध नोंदवला..मुंबईकर म्हणून आमचं रक्त उसळणं कधीच बंद झालंय. तुम्हाला सांगतो दरवर्षी आम्ही कोट्यवधी रूपयांचा टॅक्स केंद्राला देतो. बदल्यात केंद्राकडून काय मिळतं तर ठेंगा...
रेल्वे प्रवासाच्या नावावर तर नुसती बोंबाबोंब...बुलेट ट्रेनचं गाजर दाखवून आमची बोळवण केली जातीय. 18 वर्षांपूर्वी म्हणाले होते एलिव्हेटेड रेल्वे करणार म्हणून...एलिव्हेटेड सोडा गेल्या 10 वर्षात आमच्या वाट्याला एकही नवी लोकल नाही. एव्हढा सगळा अन्याय आमच्यावर होऊनही आम्ही नेभळटासारखं सारं काही सहन करत आहोत.
आम्हाला काहीच फरक पडत नाही. कारण आम्ही मुंबईकर षंढ झालो आहोत. आम्हाला कुणाला जाब विचारावासा वाटत नाही. आमचे नेते रात्रंदिवस एकमेकांचे पाय खेचण्यात मग्न असणाऱ्या राजकारण्यांना प्रश्न विचारायची आमच्यात हिंमत नाही. आम्ही पेटून उठतो ते फक्त सोशल मीडियाच्या व्हर्चुअल जगात... धक्केबुक्के खात, रडत रखडत का होईना आमचं आमच्या फांदीवर मस्त चाललंय.
क्रांती, आंदोलन, निषेध हे शब्द आम्ही आमच्या डिक्शनरीतून कधीच काढून टाकले आहेत. आम्ही ठरवलंय यंत्रणा कितीही निगरगट्ट झाल्या त्यांनी आपलं कितीही शोषण केलं, आपल्याला जनावरांसारखं वागवलं तरी आपण ते निमूटपणे सहन करायचं...कारण आम्ही मुंबईकर आहोत...बघतो... सहन करतो आणि थंड बसतो.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.