मुंबई आंदोलनासाठी सरकारचे नवे नियम
लक्ष्मण हाके आणि मनोज जरांगे यांच्या आंदोलनापूर्वी सरकारकडून झटका
दक्षिण मुंबईत आंदोलनासाठी आझाद मैदान एकमेव ठिकाण
मुंबईत आंदोलनासाठी सात दिवस आधी परवानगी घेणे बंधनकारक
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांनी २९ ऑगस्ट रोजी मुंबईत आंदोलनाचा इशारा दिला. तर दुसरीकडे ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंनीही १ सप्टेंबर रोजी मुंबईत महामोर्चा आयोजित केला आहे. मात्र, या दोन्ही नेत्यांना आंदोलनापूर्वीच मोठा झटका बसला आहे. राज्याच्या गृह विभागानं तातडीचं आदेश काढून मुंबईत आझाद मैदान वगळता कुठेही आंदोलन करण्यास मनाई केली आहे. आझाद मैदानातही एका दिवसाच्यावर आंदोलन करता येणार नाही. तसंच आखून दिलेल्या वेळेतच आंदोलन करता येणार आहे. तसंच सात दिवस आधीच परवानगी अर्ज करणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे जरांगे आणि हाकेंसाठी हा मोठा झटका असल्याचं मानलं जात आहे
दक्षिण मुंबईतील आंदोलनांसाठी राज्य सरकारने नवे नियम लागू केले आहेत. सरकारने हे नवे नियम जारी केले आहेत. दक्षिण मुंबईत आंदोलन, मोर्चा, धरणे किंवा निदर्शनांसाठी आझाद मैदान हे एकमेव ठिकाण निश्चित केले आहे. कोणत्याही आंदोलनाला एकाच दिवसाची परवानगी दिली जाणार आहे. त्यासाठी किमान स७ दिवस आधी संबंधित पोलिसांकडे अर्ज करणे बंधनकारक असणार आहे.
महाराष्ट्र पोलिस अधिनियमांतर्गत राजपत्राद्वारे जाहीर सभा, मोर्चे, आंदोलने, निदर्शनांसाठी निर्बंध निश्चित केले आहेत. नागरिकांना आणि वाहतुकीला कमीत कमी अडथळा व्हावा तसेच आंदोलने शिस्तबद्ध पद्धतीने व्हावीत यासाठी हे नियम लागू करण्यात आले आहेत. आझाद मैदानाव्यतिरिक्त दक्षिण मुंबईतील अन्य कोणत्याही ठिकाणी आंदोलन, धरणे किंवा मोर्चा काढण्यास मनाई करण्यात आली आहे. महत्वाचे म्हणजे व्हीआयपी दौरे असताना देखील मनाई करण्यात आली आहे.
आंदोलनासाठी परवानगी मिळावी यासाठी आधी अर्ज करावा लागणार आहे. एका वेळी फक्त एका दिवसासाठी परवानगी मिळणार आहे. शासकीय कामकाजाच्या सायंकाळी ६ वाजल्यानंतर मैदान रिकामे करावे लागणार आहे. म्हणजेच आंदोलनाची वेळी सकाळी ९ ते सायंकाळी ६ अशी असणार आहे. यानंतर मैदानात थांबणाऱ्यांवर कारवाई केली जाईल. एका वेळी जास्तीत जास्त ५००० आंदोलकांनाच मैदानात उपस्थित राहता येणार आहे.
आंदोलनाच्या वेळी वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी देखील महत्वाचे नियम जारी करण्यात आले आहे. मैदानाकडे येणारा किंवा बाहेर जाणाऱ्या ठिकाणी मोर्चा काढण्यास मनाई केली आहे. आंदोलनात ट्रॅक्टर, ट्रॉली, बैलगाडी, सायकल-रिक्षा, हातगाडी, जड वाहने, प्राणी आणण्यासही बंदी घातली आहे. आंदोलनासाठी सुट्टीच्या दिवशी परवानगी दिली जाणार आहे. अधिवेशन, व्हीव्हीआयपी किंवा व्हीआयपी दौरे, स्वातंत्र्यदिन, प्रजासत्ताक दिन, सुरक्षा कारणास्तव परवानगी नाकारण्यात येणार आहे.
आंदोलनादरम्यान परवानगीशिवाय ध्वनिक्षेपक वापरण्यास मनाई केली आहे. आंदोलनातील झेंडा किंवा बॅनरचा आकार ९ फूट बाय ६ फुटांपेक्षा मोठा नसावा. या बॅनरसाठी वापरण्यात येणारी काठी २ फुटांपेक्षा जास्त लांब नसावी. लाठ्या, तलवारी, बंदुका, भाले जवळ बाळगण्यास बंदी असणार आहे. आंदोलनादरम्यान भडकाऊ भाषणे करणाऱ्यांवरही कारवाई केली जाणार आहे.
त्याचसोबत, आंदोलनादरम्यान आक्षेपार्ह चित्रफीत किंवा ध्वनिफीत तयार करून ते समाजमाध्यमांवर प्रसारित करणे, आत्मदहन किंवा आत्महत्येचा प्रयत्न करणे, आमरण उपोषण करणे, पुतळे, कागदपत्रे किंवा पुस्तके जाळण्यास मनाई असणार आहे. आंदोलनस्थळी अन्न शिजवण्यास देखील बंदी असणार आहे. आंदोलनादरम्यान मालमत्तेचे नुकसान झाल्यास त्याची भरपाई आयोजकाकडून वसूल केली जाणार आहे. महत्वाचे म्हणजे आंदोलनादरम्यान नियमांचे उल्लंघन केल्यास फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येईल.