राज्यभरात आज गणेश चतुर्थीचा उत्साह असून लाडक्या बाप्पाच्या आगमनाला आता अवघ्या काही तासांचा कालावधी शिल्लक आहे. मुंबईत बाप्पाच्या स्वागताची जोरदार तयारी सुरु झाली असून ढोल ताशांच्या गजरात स्वागत केलं जात आहे. अशातच आगमनापूर्वीच मुंबईकरांना बाप्पा पावला आहे. कारण, गणेश चतुर्थीनिमित्त होणारी गर्दी लक्षात घेता रविवारी घेण्यात येणारा मेगाब्लॉक रेल्वेने रद्द केला आहे.
रेल्वेच्या या निर्णयामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला असून लाडक्या बाप्पाच्या दर्शनासाठी सुखकर प्रवास करता येणार आहे. इतकंच नाही तर या कालावधीत लोकल ट्रेनच्या (Mumbai Local Train) फेऱ्या देखील वाढवण्याचा निर्णय घेतलाय. रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, रविवारी म्हणजेच ८ सप्टेंबर रोजी कोणत्याही मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार नाही. तिन्ही मार्गावरील लोकलसेवा सुरळीत सुरू राहणार आहे.
मात्र, असं असलं तरी मध्य रेल्वेवर विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी शनिवारी (७ सप्टेंबर) रात्रकालीन ब्लॉक घेण्यात येणार आहे. मस्जिद आणि कुर्ला अप आणि डाऊन धीमा मार्ग शनिवारी रात्री १२.३० ते पहाटे ४.३० पर्यंत ब्लॉक घेण्यात येईल. ब्लॉक कालावधीत सीएसएमटी – विद्याविहार अप आणि डाऊन धीम्या मार्गावरील लोकल जलद मार्गावर वळवण्यात येतील.
या लोकल गाड्या भायखळा, परळ, दादर, माटुंगा, शीव आणि कुर्ला स्थानकांदरम्यान थांबतील. त्यानंतर पुढे डाऊन धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. दुसरीकडे गणेशोत्सव (Ganeshotsav 2024) निर्विघ्नपणे पार पडावा यासाठी मुंबई पोलिसांनी खास खबरदारी घेतली आहे. शहरात ठिकठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनाद करण्यात आला आहे.
गणेशोत्सव आणि ईद – ए – मिलाद हे दोन्ही सण एकत्र असल्यामुळे शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांकडून विशेष उपाययोजना करण्यात येणार आहे. समाजात जातील सलोखा बिघडवणारे, धार्मिक तेढ वाढवणारे, बेकायदा शस्त्रांद्वारे गुन्हे करणाऱ्यांवर आधीच प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे.
याशिवाय सराईत आरोपी, मोबाइल चोर, पाकिटमार यांना देखील नोटीसी धाडण्यात आल्या आहेत. गर्दीची ठिकाणे, बाजारपेठा तसेच संवेदनशील ठिकाणी साध्या वेशात पोलीस तैनात असणार आहे. याशिवाय सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची देखील करडी नजर असणार आहे. मुंबई शहरात ३२ उपायुक्त, ४५ सहाय्यक पोलीस आयुक्तांसह २४३५ पोलीस अधिकारी व १२ हजार ४२० कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.