Mumbai news  Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai School Bus : माणुसकी! मुंबईला पावसाचा तडाखा, स्कूल बस अडकली पाण्यात, धो धो पावसात पोलिसांनी मुलांना वाचवले

Mumbai News : मुंबईत मुसळधार पावसामुळे रेड अलर्ट घोषित करण्यात आला असून शाळा-महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे. अशातच माटुंग्यातील नामांकित शाळेची बस पाण्यात अडकली. पोलिसांच्या मदतीने सर्वांची सुरक्षित सुटका करण्यात आली आहे.

Alisha Khedekar

  • मुंबई, ठाणे, रायगड, पालघर जिल्ह्यांना रेड अलर्ट घोषित.

  • मुसळधार पावसामुळे शाळा-महाविद्यालयांना तातडीने सुट्टी.

  • माटुंग्यात डॉन बॉस्को शाळेची बस पाण्यात अडकली, पोलिसांनी मुलांची सुटका केली.

  • पुढील ४८ तासांत आणखी मुसळधार पावसाचा अंदाज, प्रशासन हायअलर्टवर.

राज्यभरात पावसाचा जोर वाढला असून मुंबईसह ठाणे, पालघर, रायगड या जिल्ह्यांना हवामान खात्याने रेड अलर्ट दिला आहे. मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, मुंबईतील अनेक ठिकाणी पाणी साचल्याने नागरिकांना मोठ्या गैरसोयींना सामोरे जावे लागत आहे. पावसाचा जोर पाहता मुंबईतील शाळा व महाविद्यालयांना तातडीने सुट्टी जाहीर करण्यात आली. सकाळच्या सत्रात शाळेत आलेल्या विद्यार्थ्यांना शिक्षकांनी घरी सोडले. तरीदेखील माटुंग्यात एक धक्कादायक प्रसंग घडला.

माटुंगा पोलिस ठाण्याजवळील डॉन बॉस्को शाळेची बस मुसळधार पावसाच्या पाण्यात अडकली. या बसमध्ये सहा लहान मुले, दोन महिला कर्मचारी आणि बसचालक जवळपास तासभर पाण्यात अडकून पडले होते. यावेळी काही जागरूक नागरिकांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिली. डीसीपी झोन ४ रागसुधा आर. यांना ही माहिती मिळताच त्यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र पवार यांच्यासह माटुंगा पोलीस दलाला घटनास्थळी पाठवले. पोलिसांनी अवघ्या दोन मिनिटांत घटनास्थळी धाव घेतली आणि मुलांसह सर्वांना सुरक्षित बाहेर काढले. अडकलेल्या विद्यार्थ्यांना पोलिस ठाण्यात आणून त्यांची काळजी घेण्यात आली. त्यांना बिस्कीट देण्यात आले आणि पोलिसांनी त्यांच्याशी संवाद साधत त्यांची भीती दूर करण्याचा प्रयत्न केला. या घटनेनंतर मुलांच्या पालकांनी सुटकेचा निश्वास सोडला.

माटुंगा पोलिसांच्या तातडीच्या कारवाईचे सर्वत्र कौतुक होत असून नागरिकांनी पोलिसांच्या तत्परतेचे स्वागत केले आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील मुसळधार पावसामुळे रस्ते जलमय झाले आहेत, लोकल वाहतूक विस्कळीत झाली असून, शेकडो वाहनं पाण्यात अडकून पडली आहेत. या पार्श्वभूमीवर माटुंग्यातील प्रसंग हा मुंबईच्या आपत्ती व्यवस्थापनाची कसोटी पाहणारा ठरला.

या मुसळधार पावसाचा फटका चेंबूर मधील रहिवाशांना देखील बसला आहे. चेंबूर परिसरातील न्यू अशोक नगर येथे एमएमआरडीच्या संरक्षणभिंतीचा मोठा भाग अचानक कोसळला. या दुर्घटनेत भिंतीलगत असलेल्या सात झोपड्यांचे मोठे नुकसान झाले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. ज्यांच्या झोपड्यांचे नुकसान झाले आहे अशा कुटुंबांना तात्पुरत्या स्वरूपात सुरक्षित स्थळी हलविण्यात आले. त्यांच्या वास्तव्याची व्यवस्था मरवली चर्च येथे करण्यात आली आहे. दरम्यान, बीएमसी प्रशासनाने प्रभावित कुटुंबांना आवश्यक ती मदत व सहाय्य देण्याचे आश्वासन दिले आहे.

मुंबई महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि अनावश्यक बाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील 48 तासांत मुंबईत आणखी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या परिस्थितीत सर्व यंत्रणांना हायअलर्टवर ठेवण्यात आले असून नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी प्रयत्न सुरू आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Rain Live News: कल्याण पूर्वेतील नेतिवली टेकडी परिसरात दरड कोसळण्याची घटना

Gadchiroli : राष्ट्रीय महामार्गाची दयनीय अवस्था; नागरिकांचे अनोखे आंदोलन, खड्ड्यात धान पिकाची रोवणी

Vivek Agnihotri : मराठी जेवण म्हणजे गरीबांचं जेवण... विवेक अग्निहोत्री बरळले, पाहा VIDEO

Mumbai Rain: 'पालिका आयुक्तांचा जलअभिषेक करू', अंधेरीत पाणी साचल्यावर मनसेचा इशारा

Mumbai Rain: मुंबईत उद्या शाळांना सुट्टी? पुढचे १२ तास महत्वाचे, मुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT