मध्य रेल्वेच्या स्थानकांचा कायापालट होणार
विविध स्थानकांवर नवीन एस्केलेटर,लिफ्ट सुरु करणार
बदलापूर, वांगणी, दादर स्थानकात महत्त्वाचा बदल
मध्य रेल्वेने रोज लाखो लोक प्रवासी करतात. मध्य रेल्वेच्या स्थानकांबाबत रेल्वेने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. अनेक स्थानकांमध्ये विविध कामे सुरु आहे. स्थानके अधिक चांगली करण्यासाठी महत्त्वाचे पाऊले उचलण्यात आली आहे. यामध्ये स्थानकांवर नवीन लाइट्स, पंखे आणि एस्केलेटर बसवण्यात येणार आहे. सर्व प्रवाशांना आरामदायी, सुलभ आणि अखंड प्रवासाचा अनुभव मिळावा यासाठी नवीन सुविधांची उभारणी करण्यात आली आहे.
एस्केलेटर
एकूण ४ नवीन एस्केलेटरची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली असून कसारा स्टेशनवर २ एस्केलेटर आणि बदलापूर स्टेशनवर २ एस्केलेटरचा समावेश आहे.
लिफ्ट
एकूण २ नवीन लिफ्टची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली असून वांगणी स्टेशनवर १ लिफ्ट आणि बदलापूर स्टेशनवर १ लिफ्टचा समावेश आहे.
हे एस्केलेटर आणि लिफ्ट ज्येष्ठ नागरिक, गर्भवती महिला, दिव्यांगजन आणि इतर प्रवाशांना दिलासादायक ठरत आहेत. प्रवाशांना प्रवासात प्लॅटफॉर्म बदलण्यासाठी सुरळीत आणि सुरक्षित जाण्या-येण्यासाठी ते उपयुक्त ठरत आहेत.
बीएलडीसी पंखे
विविध स्थानकांवर एकूण १४२ नवीन ब्रशलेस डायरेक्ट करंट (बीएलडीसी) पंखे बसविण्यात आले आहेत आणि २८९ जुने बीएलडीसी पंखे नवीन पंख्यांनी बदलण्यात आले आहेत. बीएलडीसी पंखे हे ब्रशलेस डीसी मोटरवर कार्य करणारे पंखे असून ते पारंपरिक इंडक्शन मोटर पंख्यांच्या तुलनेत अधिक ऊर्जा कार्यक्षम आणि कमी आवाज करणारे आहेत. या पंख्यांमध्ये कार्बन ब्रशऐवजी इलेक्ट्रॉनिक कंट्रोलर व कायमस्वरूपी चुंबकांचा वापर करण्यात येतो, त्यामुळे ऊर्जेचा वापर सुमारे ५० ते ७० टक्क्यांनी लक्षणीयरीत्या कमी होतो.
एचव्हीएलएस (HVLS) पंखे
दादर स्थानकावरील वेगवेगळ्या फलाटांवर ८ नवीन हाय व्हॉल्यूम लो स्पीड (HVLS) पंखे देण्यात आले आहेत.
एचव्हीएलएस पंखे मोठ्या जागेत मोठ्या प्रमाणात हवा हळूहळू फिरवून प्रभावी थंडावा व हवेशीर वातावरण निर्माण करतात, तसेच कमी ऊर्जेच्या वापरात अधिक आराम व ऊर्जा बचत प्रदान करतात.
उत्तम एलईडी लाइट्स
विविध स्थानकांवर ३६२ नवीन एलईडी दिवे देण्यात आले आहेत आणि १६३५ जुने एलईडी दिवे नवीन दिव्यांनी बदलण्यात आले आहेत. हे एलईडी दिवे ऊर्जा कार्यक्षम असून त्यांचा वापरकाल जास्त आहे तसेच देखभाल व बदल खर्च कमी आहे. हे दिवे अधिक चांगला प्रकाश देतात आणि पर्यावरणपूरक आहेत.
मेल आणि एक्सप्रेस ट्रेन डिस्प्ले बोर्ड
लोकमान्य टिळक टर्मिनस येथे एकूण ४ नवीन ट्रेन डिस्प्ले बोर्ड देण्यात आले आहेत, ज्यामध्ये २ इनडोअर डिस्प्ले बोर्ड आणि २ आउटडोअर डिस्प्ले बोर्ड यांचा समावेश आहे.
उपनगरीय रेल्वे स्थानकांवर नवीन इंडिकेटर्स
नेरुळ, पनवेल, डॉकयार्ड रोड, शिवडी, रे रोड यासह विविध स्थानकांवर एकूण ५६ नवीन उपनगरीय इंडिकेटर्स देण्यात आले आहेत. यामध्ये नेरुळ फूट ओव्हर ब्रिजवर देण्यात आलेले ६ नवीन उपनगरीय इंडिकेटर्स यांचा समावेश आहे.विविध स्थानकांवरील जुने इंडिकेटर्सदेखील नवीन इंडिकेटर्सनी बदलण्यात आले आहेत. हे नवीन इंडिकेटर्स दिसायला आकर्षक आहेत आणि त्यांची स्पष्टता उत्तम आहे.
मध्य रेल्वे स्थानकांवरील सुविधांच्या उन्नतीसाठी सातत्याने प्रयत्नशील असून, एकूण प्रवासाचा अनुभव अधिक उत्तम करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान व पायाभूत सुविधांमधील सुधारणा राबवत आहे. या उपक्रमांद्वारे प्रवासीस्नेही रेल्वे जाळ्याच्या दृष्टीकोनाशी सुसंगतपणे सुलभता, सोय आणि सुरक्षिततेवर विशेष भर देण्यात येत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.