नगरसेविका रेखा यादव यांच्याकडे दोन रेशन कार्डे आणि तीन मतदार ओळखपत्रे असल्याचा गंभीर आरोप .
आरटीआय कागदपत्रे आणि शासकीय संकेतस्थळांवरील नोंदींच्या आधारे हा दावा
एका रेशन कार्डाचा वापर जात प्रमाणपत्रासाठी आणि दुसऱ्याचा जात पडताळणी समितीसमोर केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
संजय गडदे, साम प्रतिनिधी
काँग्रेसच्या माजी नगरसेविका शितल मात्रे यांच्या म्हणण्यानुसार, रेखा यादव यांच्याकडे दोन स्वतंत्र रेशन कार्डे असल्याचे आढळले आहे. यापैकी एक रेशन कार्ड जात प्रमाणपत्रासाठी तर दुसरे जात पडताळणी समितीसमोर सादर करण्यात आल्याचा दावा करण्यात आला. एका कुटुंबाकडे एकच रेशन कार्ड असू शकते, मात्र दोन रेशन कार्डांचा वापर करून शासकीय लाभ मिळविण्यात आल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.
तसेच यादव यांचे नाव महाराष्ट्रातील बोरिवली विधानसभा मतदारसंघात दोन वेगवेगळ्या मतदार ओळखपत्र क्रमांकांसह नोंद असल्याचा दावा करण्यात आला आहे. याशिवाय उत्तर प्रदेशातील जौनपूर जिल्ह्यातील मतदार यादीतही त्यांची नोंद असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे.
ही बाब लोकप्रतिनिधित्व कायदा १९५० मधील तरतुदींचे उल्लंघन असल्याचा आरोप करण्यात आला. बीएमसीच्या एल. टी. रोड रुंदीकरण पुनर्वसन योजनेत घर मिळविताना स्वतःकडे किंवा पतीकडे कोणतीही मालमत्ता नसल्याचे शपथपत्र दिले होते. मात्र २०१७ आणि २०२६ च्या निवडणूक प्रतिज्ञापत्रांमध्ये त्यांच्या पतीच्या मालकीची आंबेडकर नगर, बोरिवली (पश्चिम) येथील मालमत्ता नमूद असल्याचे काँग्रेसने सांगितले.
या प्रकरणी दुहेरी रेशन कार्डे रद्द करणे, बहुपदरी मतदार नोंदणीची चौकशी करणे, पुनर्वसन घराचा लाभ रद्द करणे, आर्थिक वसुली करणे तसेच महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमांतर्गत अपात्रतेची कारवाई सुरू करण्याची मागणी काँग्रेसने केली आहे. काँग्रेस नेत्या शीतल अशोक म्हात्रे यांनी, “हे राजकीय आरोप नसून अधिकृत कागदपत्रांच्या आधारे उपस्थित केलेले प्रश्न आहेत. संबंधित प्रकरणांची सखोल चौकशी होऊन सत्य जनतेसमोर यावे,” अशी मागणी केली. दरम्यान, या आरोपांवर नगरसेविका रेखा यादव किंवा त्यांच्या प्रतिनिधींकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया मिळालेली नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.