BEST bus accident in Kandivali today : मुंबईतील दादर येथे बेस्ट बस अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू झाला. ही घटना ताजी असतानाच मुंबईत पुन्हा एकदा बेस्ट बसचा अपघात झाला आहे. आज कांदिवलीमध्ये भरधाव वेगाने जाणाऱ्या बेस्ट बसने दोन जणांना जोरात धडक दिली. यात एक जण गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
पोईसर डेपोजवळ अपघाताची ही घटना घडली. इलेक्ट्रिक बस (मार्ग क्रमांक ए-२७७/३८) गोराई डेपोतून जात असताना हा अपघात झाला. हा अपघात सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या अपघातात आदर्श हिरालाल यादव (२४) आणि सोनम मौर्य (२४) हे जखमी झाले आहेत. बस कंडक्टरने त्यांना उपचारासाठी जवळच्या शताब्दी रुग्णालयात दाखल केले.
सोनमच्या डोक्याला आणि पायाला गंभीर दुखापत झाली आहे. तिच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत, तर आदर्शच्या खांद्याला आणि उजव्या डोळ्याजवळ किरकोळ दुखापत झाली आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज जप्त केले असून अपघाताच्या कारणाचा तपास केला जात असल्याची माहिती स्थानिक अधिकाऱ्यांनी दिली.
२ दिवसांपूर्वी दादर रेल्वे स्टेशनजवळ गर्दीच्या वेळी बेस्ट बसने पाच वाहनांना धडक दिली होती. या अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता, तर ५ जण जखमी झाले होते. बस भरधाव वेगाने रस्त्यावरून जात असताना अनेक वाहनांना धडकल्याचे व्हिडिओत दिसत होते. अपघाताचा धक्का इतका जोरदार होता की त्यामुळे बसच्या बाहेरील भागाचे मोठे नुकसान झाले आणि तिची समोरची काच फुटली.
गेल्या वर्षी भांडुपमध्ये बेस्ट बसने अनेकांना चिरडले होते. यामध्ये चार जणांचा मृत्यू झाला होता. दुसऱ्या एका अपघातात मुलुंडमध्ये बेस्ट बसखाली चिरडून एका वृद्ध महिलेचा मृत्यू झाला होता. असाच एक अपघात गेल्या एप्रिलमध्ये मुंबईच्या प्रभादेवीमध्ये झाला होता. कुर्लामध्येही बेस्ट बस अपघातात अनेकांचा मृत्यू झाला होता.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.