पुण्यातील कुप्रसिद्ध गुंड गजा मारणेची (Gaja Marne) भेट घेतल्यामुळे अहमदनगरचे नवनिर्वाचित खासदार निलेश लंके (MP Nilesh Lanke) वादाच्या भोवऱ्यामध्ये साडलेत. या भेटीवरून निलेश लंकेंवर टीकेची झोड सुरू आहे. आता या भेटीबाबत निलेश लंके यांनी स्पष्टीकरण दिले आहे. गजा मारणेची भेट अपघाताने झाली असल्याचे निलेश लंके यांनी सांगितले. माध्यमांशी संवाद साधताना निलेश लंके यांनी गजा मारणे आणि आपल्या भेटीमागचे नेमकं कारण सांगितले आहे.
निलेश लंके यांनी अहमदनगरमध्ये माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, 'परवा दिवशी दिल्लीला मला काही डॉक्युमेंट्सची पूर्तता करायची होती. ती पूर्तता करून काल मी पुणे एअरपोर्टवर उतरलो. त्यानंतर मला काही हॉस्पिटलला भेटी द्यायच्या होत्या. आमचे पवार नावाचे सहकारी मित्र त्यांचे कॅन्सरने निधन झाले. ते उत्कृष्ट पैलवान आणि चांगले संघटक होते. त्यांच्या कुटुंबाला सांत्वनपर भेट देण्यासाठी मी गेलो होतो. त्यानंतर आमच्या प्रविण धनवे नावाच्या कार्यकर्त्याच्या घरी मी भेट देण्यासाठी गेलो होतो. त्याच्या घरातून बाहेर पडल्यानंतर आम्ही रस्त्यावरून जात होतो. पुणे शहरातील छोट्या रस्त्यावर ४ ते ५ जणांचे टोळके उभे होते. त्यांनी मला हात केला आणि मी थांबलो. त्यांनी मला चहा प्यायला चला असे सांगितले. मी गडबड असल्याचे सांगत नाही म्हणालो पण त्यांनी मला खूप आग्रह केला. ते म्हणले पलिकडेच घर आहे.'
निलेश लंके यांनी पुढे सांगितले की, 'मी गेलो चहा प्यायलो. त्यांनी माझा सत्कार पण केला. तोपर्यंत मला ती व्यक्ती कोण आहे, त्या व्यक्तीची काही पार्श्वभूमी आहे हे माहिती नव्हते. ज्यावेळी मी बाहेर पडलो. तासाभराने फोन आला तुम्ही या भागामध्ये आले होते. तो तुमचा नियोजित दौरा होता का? मी सांगितले नियोजित सांत्वनपर भेट होती. मग त्यांनी मला कल्पना दिली. तेव्हा मला संबंधित व्यक्तीची पार्श्वभूमी माहिती झाली. तसं पाहिलं तर हा एक अपघात झाला आहे. मला पार्श्वभूमी माहिती असती तर मी चुकूनही गेलो नसतो. ही घटना नंतर कळाल्यानंतर मला समजले. हा एक अपघात आहे.'
यावेळी निलेश लंके यांनी टीका करणाऱ्यांना देखील उत्तर दिले. त्यांनी सांगितले की, 'टीका झाली तर त्याला काय करू शकतो. आता झाली चूक तर झाली. मला माहिती असते तर मी गेलोच नसतो. पण माहिती नसल्यामुळे आपण चुकतो अशी गंमत झाली. लोकांना भांडवलच नाही राहिले त्यामुळे ते राजकारण करतात. माझी आणि त्यांचे काही संबंध असते. कुठे आम्ही कार्यक्रमाला भेटलो असतो. तर ती जाणीवपूर्वक नाही तर नियोजित भेट असती. पण ही अपघाताने झालेले भेट आहे.', असे म्हणत निलेश लंके यांनी गजा मारणेसोबतच्या भेटीमागचे स्पष्टीकरण दिले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.