Rajgurunagar : आंधळं दळतय आणि कुत्रं पीठ खातय.. ! या म्हणीप्रमाणे राजगुरूनगर नगरपरिषदेचा (rajgurunagar muncipal council) कारभार सुरू असल्याचे खेड तालुका मनसेच्या (mns) कार्यकर्त्यांनी नागरिकांच्या निदर्शनास आणुन दिले आहे. अनेक नागरिकांनी घरपट्टी (मिळकत कर) भरलेली असताना आणि त्या पावती घरात असताना त्यांना गेल्या सात वर्षात आपण घरपट्टी भरलेली नसुन ती तातडीने भरावी अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल अशा नोटीस बजावल्या गेल्या आहेत. (Maharashtra News)
पालिकेच्या या नाेटीसांबाबत मनसेच्या (mns) कार्यकर्त्यांनी जोरदार आक्षेप घेतला आहे. जिल्हाध्यक्ष समीर थिगळे, मंगेश सावंत, राजगुरूनगर शहराध्यक्ष सोपान डुंबरे,सुजित थिगळे, आदित्य शिर्के,रुपेश ताये आदींनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून या भोंगळ कारभाराची चौकशी करण्याची मागणी आयुक्तांकडे केली आहे. नगरपरिषदेच्या अशा मनमानी विरुद्ध तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा मनसेने दिला आहे.
सन २०१४ मध्ये राजगुरूनगरला नगरपरिषद अस्तित्वात आली. एक वर्षानंतर नगरसेवक निवडले गेले. मात्र पाच वर्षातील कारभार पाहता ग्रामपंचायत बरी होती असे नागरिक बोलत आहेत. पंचवार्षिक काळात नगरपरिषदेत अनेक चुकीचे कारभार आणि गैरव्यवहार उघडकीस आले. २०१६-१७ मध्ये कर्मचाऱ्यांनी कर वसुली केली.
मात्र ७७ लाख रुपयांची रक्कम नगरपरिषद खात्यावर जमा केली नव्हती. असाच प्रकार सध्या सुरू असुन त्यावर कोणाचाही अंकुश नाही.नगरपरिषदेवर गेली दोन वर्षे प्रशासक आहे. जबाबदार अधिकारी पुर्ण वेळ नाहीत. त्यामुळेच काही कर्मचाऱ्यांनी एजंट नेमुन शहरात घरोघरी थकीत कर वसुली सुरू केली आहे.
मात्र त्यातील अनेकांनी यापूर्वीच घरपट्टी रक्कम भरलेली असल्याचे यावेळी समीर थिगळे व सहकाऱ्यांनी कागदपात्रांच्या आधारे पत्रकारांना दाखवले.अशा प्रकारे होणाऱ्या बेबंदशाही विरोधात लवकरच मनसे स्टाईल आंदोलन करण्यात येईल असे ते म्हणाले.
राजगुरूनगर शहरात नागरिकांना कोणत्याही प्रकारच्या सुविधा उपलब्ध नाहीत. उलट दुषित पाणी,खड्यांचे रस्ते,चौकाचौकात आणि रस्त्यावर साठलेला कचरा ,बेशिस्त पार्किंग यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. शहरात आरोग्याच्या दृष्टीने अनेक समस्या निर्माण होत आहेत. पदाधिकारी मुदत संपुन गेली तरी नगरपरिषदेत नाहक लुडबुड करतात. अधिकारी बेपर्वाईने वागतात.सर्वसामान्य माणसाला शहरात कुणी वाली राहिलेला नाही असेही समीर थिगळे यांनी नमूद केले.
Edited By : Siddharth Latkar
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.