पुण्यातील बीएलएकडून मतदार याद्यांचे काम अपूर्ण राहिल्याने राज ठाकरे नाराज.
अनेक शाखा अध्यक्षांनी काम वेळेत पूर्ण न केल्याचे राज ठाकरे यांनी बैठकीत उघड केले.
पक्षातील महिला पदाधिकाऱ्यांची संख्या अत्यंत कमी असल्याबद्दलही नाराजी व्यक्त.
आगामी बैठकीपूर्वी दिलेले सर्व काम पूर्ण करण्याचे मनसे नेत्यांवर प्रचंड दडपण.
Why Raj Thackeray is upset with MNS Pune leaders : आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदार याद्यांच्या पडताळणीसाठी बुथ लेव्हल एजंट (बी एल ए) यांनी केलेल्या कामाची स्थिती पाहून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुण्यातील बैठकीत नाराजी व्यक्त केली होती. "काम करायचे नसेल, तर पदं सोडा" असा इशारा देखील राज ठाकरे यांनी दिला होता. मतदार याद्यांचे काम अपूर्ण झाल्यामुळे राज ठाकरे यांनी निराशा व्यक्त केली होती. त्यानंतर अवघ्या ४ दिवसात काम पूर्ण करू असे आश्वासन नेत्यांनी दिले. या नंतर पुण्यातील दोन ते तीन नेत्यांनी राज ठाकरे यांची मुंबईत जाऊन भेट घेतली. पक्षाचे अध्यक्ष यांची नाराजी दूर करण्याचा या नेत्यांनी प्रयत्न केला तसंच मतदार याद्यांचे काम कसं सुरू आहे हे सुद्धा दाखवलं. मात्र, नाराजी दूर करण्यात या नेत्यांना अपयश आलं. या बैठकीत सुद्धा राज ठाकरे यांनी कामाच्या पद्धतीवरून नाराजी व्यक्त केली आणि पुन्हा बदल करून दिलेले "काम" पुन्हा सादर करा असे सांगितलं.
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे गेल्या काही महिन्यांपासून राज्यातील मतदार यादी मध्ये होणाऱ्या घोळ आणि गोंधळाबाबत आक्रमक भूमिका मांडत आहेत. मतदार याद्या अद्ययावत आहे का, याबाबत माहिती घेण्याचे आदेश त्यांनी शहरातील शाखा अध्यक्षांना दिले आहेत. पुणे शहरात बी एल ए नेमण्यासाठी विधानसभा मतदारसंघनिहाय प्रमुख पदाधिकाऱ्यांवर जबाबदारी सोपविण्यात आली आहे. हडपसर विधानसभा मतदार संघाची जबाबदारी शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांच्याकडे आहे. वडगाव शेरी मतदार संघासाठी माजी नगरसेवक बाबू वागस्कर, कसबा मतदार संघासाठी अजय शिंदे, कोथरुडसाठी प्रदेश सरचिटणीस हेमंत संभूस आणि गणेश सातपुते, शिवाजीनगर मध्ये रणजीत शिरोळे, पुणे कॅन्टोन्मेंटसाठी बाळा शेडगे आणि खडकवासला मतदार संघाची जबाबदारी किशोर शिंदे यांच्यावर आहे. त्यामुळे येत्या सोमवारी पुन्हा एकदा पुण्यातील मनसे चे नेते राज ठाकरे यांची मुंबईत जाऊन भेट घेण्याची शक्यता आहे. यावेळी तरी बी एल ए यांनी दिलेल्या आदेशाचे पालन केलं असेल अशी अपेक्षा आहे.
राज्यातील विविध विषयांवर मुंबईत मनसे चे अनेक नेते भूमिका मांडताना दिसतात. राज ठाकरे उद्धव ठाकरे यांची युती, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका यासह अनेक विषयांवर सातत्याने बाळा नांदगावकर, अविनाश अभ्यंकर, संदीप देशपांडे, अविनाश जाधव हे नेते नेहमी अग्रेसर भूमिका घेताना दिसतात.
पुणे शहरात मात्र हे चित्र उलटं आहे. शहरात एवढ्या गोष्टी घडत असताना सुद्धा पुण्यातील मनसे मात्र कुठेही भूमिका घेत नसल्याचं दिसून आलं आहे. पुण्यातील वाढती गुन्हेगारी, वाहतूककोंडी, मतदार यादीतील गोंधळ, महापालिकेतील अनेक प्रश्न, समाविष्ट झालेल्या ३४ गावांचा विषय अशा अनेक मुद्द्यांवर पुणे शहरातील मनसे ची भूमिका थंड दिसली.
राज ठाकरे यांनी पुण्यातील संकल्प हॉल याठिकाणी बैठकी घेतली असता त्यांनी ब्लॉक लेव्हल एजंट (बी एल ए) यांना दिलेल्या कामाबद्दल प्रश्न विचारला असता अनेकांनी ते काम पूर्ण झालं नसल्याचं सांगितलं. पुणे शहरातील वॉर्डनुसार मतदार याद्या काढून त्याचा अहवाल तयार करण्याच्या सूचना वॉर्ड अध्यक्षांना देण्यात आल्या होत्या. ज्या वॉर्ड अध्यक्षांनी याद्या दिल्या नाहीत त्या सर्वांना राज ठाकरे यांनी "मागे जाऊन थांबा" असं सांगितलं. तसेच उर्वरित असलेल्यांना पुन्हा "खरं सांगा, यातील सगळ्यांनी दिल्या आहेत ना याद्या?" असा प्रश्न केला असता त्यातील पुन्हा एकदा ४ जणांनी हाथ वर करून "नाही" असे उत्तर दिलं. पुणे शहरात १६५ वॉर्ड आहेत ज्याला मनसेकडून ११० शाखा अध्यक्ष आहेत. साधारण एक वॉर्ड मधून १८ ते २० मतदार याद्या देण्याच्या सूचना त्यांना देण्यात आल्या होत्या. मात्र या बैठकीदरम्यान, पुणे शहरातील बी एल ए यांनी अवघ्या ५५ याद्या दिल्यामुळे राज ठाकरे यांनी नाराजी व्यक्त केली.
या बैठकीत राज ठाकरे यांनी जे पदाधिकारी किंवा शाखा अध्यक्ष काम करत नसतील त्यांना बदलून टाका किंवा काढून टाका असा आदेश दिला होता. त्यामुळे आता येत्या बैठकीपर्यंत तरी ते पदाधिकाऱ्यांनी दिलेले काम पूर्ण करणार का असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
गेल्या काही दिवसांपासून पुणे शहरात विविध राजकीय पक्षाकडून महिला पदाधिकाऱ्यांची मोर्चबांधणी सुरू असली तरी सुद्धा मनसे मध्ये मात्र महिला पदाधिकारी किंबहुना महिला कार्यकर्त्यांची संख्या फारच कमी असल्याचं दिसून आलं आहे. राज ठाकरेंच्या नेतृत्वात झालेल्या बैठकीत सुद्धा हा मुद्दा उपस्थित केला गेला. महिला पदाधिकारी यांच्या संख्येवरून सुद्धा राज ठाकरे यांनी नाराजी व्यक्त केली. मनसेच्या पुणे शहर महिला अध्यक्ष वनिता वागसकर या बैठकीला उपस्थित होत्या. यावेळी बैठकीला महिला पदाधिकारी यांची संख्या अवघी हातावर मोजण्याइतकी होती त्यामुळे येत्या काळात महिलांचा पक्षात सहभाग वाढवा अशा सूचना राज ठाकरे यांनी यावेळी दिल्या.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.