ठाण्यातील आनंद आश्रमात नोटा उधळण्याच्या घटनेवरून राजाकारण तापले आहे. या घटनेचा व्हिडीओ केदार दिघेने सोशल मीडियावर शेअर केला होता. आनंद आश्रमाचे पावित्र्य नष्ट केल्याचा आरोप त्यांनी केला होता. या घटनेनंतर पैसे उधळणाऱ्यांवर कारवाई करत त्यांना पदावरून काढून टाकण्यात आले आणि त्यांनी माफी देखील मागितली. आता याप्रकरणावरून शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 'कारवाई करून पदावरून काढणं, खुलासे आणि माफ्या ही सर्व नोटंकी असते.', अशी टीका संजय राऊत यांनी केली.
व्हायरल होणाऱ्या व्हिडीओतील दृश्य अत्यंत विचलित करणारे असल्याची प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली. त्यांनी सांगितले की, 'ठाण्यासारख्या सुसंस्कृत शहरांमध्ये ठाण्याच्या अनेक साहित्यिक कवी लेखक इथे निर्माण झाले, सामाजिक कार्यकर्ते निर्माण झाले. या ठाण्याने शिवसेनेला पहिली सत्ता महाराष्ट्रात मिळून दिली असे सुसंस्कृत शहर ठाणे आहे. या ठाण्यामध्ये शिवसेनेने अनेक नेते निर्माण केले. सतीश प्रधान , मो.दा जोशी , असतील धर्मवीर आनंद दिघे यांना तुम्ही आपले गुरु मानत आहात आणि त्यांची जी वास्तू होती त्या वास्तूमधून ते न्याय द्यायचे, दरबार घडवायचे लोकांना भेटायचे, तिथे त्यांचं वास्तव्य होतं. त्या वास्तूमध्ये या मिंधे सेनेच्या लोकांनी लेडीज बारमध्ये नाचतात आणि पैसे उधळतात त्या पद्धतीचा जो उपक्रम साजरा केला हे चित्र अत्यंत विचलित करणारे आहे.'
संजय राऊत यांनी पुढे सांगितले की, 'आनंद दिघे जिथे बसत होते त्या खुर्चीवरती एक हंटर लावलेला असायचा. त्या हंटरचा अर्थ असा होता चुकाल तर पाठीवर हंटर पडेल असं आम्ही म्हणायचो आणि अनेकांना तो हंटर पडलेला आहे. आनंद दिघेसाहेब असतील तर हे आतमध्ये घुसलेले मिंधे सेनेची लोकं त्यांना आणि त्यांच्या बॉसला चाबकाने फोडून काढलं असतं टेंभी नाक्यावर. कुठली संस्कृती ठाण्यामध्ये आली एक तर तुम्ही आनंद आश्रमाचा बेकायदेशीर ताबा घेतला. त्यांचे जे मूळ मालक होते त्यांना धाक, दहशत या माध्यमातून ताबा घेतला.'
तसंच, 'मुळात ती शिवसेनेची प्रॉपर्टी आहे आनंदी दिघे साहेबांची प्रॉपर्टी आहे. आनंद दिघे म्हणजे तुमचे खासगी नाही कोणी. अशा पद्धतीने ठाण्यातील लोकांची मान शरमेने खाली जाईल अशा प्रकारचे कृत्य तुम्ही केले आहे. मिंधे सेनेचे जे वरचे सरदार आहेत, शिलेदार आहेत ही त्यांची संस्कृती आहे. ती खाली आली आहे. त्यामुळे आता कोण माफी मागत असेल पदावरून काढला असेल अमूक असेल ही पूर्णपणे नोटंकी आहे.', असे म्हणत संजय राऊत यांनी संताप व्यक्त केला.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.