Saamana Editorial on Meera Road and Churchgate Case: कोल्हापूर येथे काही समाजकंटकांनी औरंगजेबाचे फोटो स्टेटसला ठेवल्यामुळे दोन समाजात वाद होऊन तणाव निर्माण झाला होता. "त्यानंतर महाराष्ट्रात औरंगजेबाच्या उदात्तीकरणाचा प्रयत्न होत आहे. औरंग्याच्या एवढ्या अवलादी कुठून आल्या?" असा सवाल राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला होता. आता ठाकरे गटाचे मुखपत्र सामनातून फडणवीसांना तिखट सवाल विचारण्यात आला आहे.
गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना असा प्रश्न पडणे हे गुप्तचर यंत्रणेचे अपयश आहे. औरंग्या ही एक क्रूरता आणि विकृती आहे. त्या विकृतीचा जात किंवा धर्माशी संबंध नसतो. आता ठाणे जिल्हय़ातील मीरा-भाईंदर येथे ‘औरंग्या’सही लाजवणारे कृत्य घडले आहे. असं सामनातून मांडण्यात आलं आहे.
गृहमंत्री फडणवीसांना नक्की कोणत्या औरंग्याची चिंता पडली आहे? आफताब असो की, मनोज साने, ओमप्रकाश कनोजिया, निरपराध मुलीचा निर्घृण बळी घेणारा प्रत्येक क्रूरकर्मा हा औरंग्याच आहे. औरंग्या महाराष्ट्रावर चाल करून आला. त्याने येथील जनतेवर अत्याचार केले. हा भयंकर इतिहास आहे. पण याच विकृतीचे नवीन औरंगे आपल्या राज्यात निर्माण झाले व त्यांना कायद्याची भीती राहिलेली नाही, असंही सामन्यात मांडण्यात आलं आहे.
काही लोकांना आजही दफन केलेला औरंग्या प्रिय वाटतो व त्याचा फोटो घेऊन ते नाचतात. याचा अर्थ गृहखाते कमजोर पडले. महाराष्ट्रात कायद्याचे राज्य नसून टोळ्यांचे राज्य सुरू आहे. म्हणूनच शरद पवारांना ‘‘तुमचा दाभोलकर करू’’ व संजय राऊतांना ‘‘सरकारविरुद्ध बोलणे बंद करा नाहीतर ठार करू,’’ अशा धमक्या उघडपणे दिल्या जातात. सत्ताधारी पक्षाचे ‘टिल्ले’ आमदार तलवारी हातात घेण्याची भाषा करतात. जग ‘एके 56’च्या पुढे गेले तरी हे लोक अजून इतिहासातील तलवारीतच रमले आहेत. या अशा प्रवृत्तींना औरंग्याच्या अवलादी नाही म्हणायचे तर काय? अशी टीकाही सामनातून करण्यात आली आहे.
मनोज साने याने त्याच्याबरोबर राहणाऱ्या सरस्वती वैद्य या 32 वर्षांच्या तरुणीची निर्घृण हत्या केली. तिचे तुकडे केले, ते कुकरमध्ये टाकले, कुत्र्यांना घातले वगैरे भयंकर बातम्या समोर आल्या आहेत. खून करणारा मनोज साने आहे व मरण पावलेली सरस्वती आहे. मनोजच्या जागी एखादा इस्माईल किंवा जावेद असता तर एव्हाना मीरा रोडमध्ये ‘लव्ह जिहाद’च्या नावाने वातावरण तापवले गेले असते व राज्यभरात हिंदू आक्रोश मोर्चे निघाले असते, असं देखील सामन्यात मांडण्यात आलं आहे.
दिल्लीजवळ श्रद्धा वालकर या तरुणीचा तितक्याच निर्घृण पद्धतीने तुकडे करून खून करणारा आफताब पूनावाला हा मुसलमान होता आणि श्रद्धासोबत ‘लिव्ह इन’मध्ये राहत होता. मीरा रोडचे मनोज व सरस्वती हेदेखील ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्येच राहत होते. उडाले की, निर्घृण पद्धतीने नात्याचा अंत केला जातो. मग समाजातील विशिष्ट गट त्या नात्यातील एखाद्याचा ‘धर्म’ पाहून आक्रोश मोर्चे काढतात. वास्तविक, आफताब पूनावाला व मनोज साने यांची वृत्ती आणि विकृती एकच आहे. येथे धर्माचा संबंध येतोच कोठे? असा सवालही सामनातून करण्यात आला आहे.
Edited by - Satish Daud
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.