मुंबई-गोवा महामार्गावर टेमपाळे येथे भीषण अपघातात महिला डॉक्टरचा जागीच मृत्यू.
कार कंटेनरखाली अडकून वाहनाचा चेंदामेंदा, एक जण गंभीर जखमी.
अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत.
पोलिसांकडून कंटेनर चालकाची चौकशी व अपघाताचा सखोल तपास सुरू.
महाराष्ट्रात बहुचर्चित असलेल्या मुंबई गोवा महामार्गावर अपघातांचे सत्र कायम सुरु असून या महामार्गावर पुन्हा एकदा भीषण अपघात घडून एक ३२ वर्षीय महिला डॉक्टरचा मृत्यू झाला आहे. तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. ही दुर्घटना रायगड जिल्ह्यातील टेमपाळे गावाच्या हद्दीत, लोणेरे आणि महाड दरम्यान घडली. रविवारी दुपारी हा अपघात झाल्याने परिसरात काही काळ वाहतुकीचा ताण निर्माण झाला.
मृत महिलेचे नाव डॉ. प्रियांका आहिर असे असून त्या व्यवसायाने डॉक्टर होत्या. मिळालेल्या माहितीनुसार, महाडच्या दिशेने जात असलेला एक कंटेनर मुंबईच्या दिशेने वेगाने जात होता. त्याच दिशेने मागून येणाऱ्या वॅगनआर कारने कंटेनरला जोरदार धडक दिली. धडकेची तीव्रता इतकी होती की कार कंटेनरच्या मागील चाकाखाली जाऊन आडकली आणि वाहनाचा पूर्णतः चेंदामेंदा झाला. कारमधील डॉ. प्रियांका आहिर यांचा जागीच मृत्यू झाला, तर सोबत असलेली आणखी एक व्यक्ती गंभीर जखमी झाली असून तिला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
अपघाताची माहिती मिळताच गोरेगाव पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी धावले. स्थानिक नागरिकांच्या मदतीने कारमधील जखमींना बाहेर काढण्यात आले. अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. पोलिसांनी क्रेनच्या साहाय्याने अपघातग्रस्त कार बाजूला केली आणि वाहतूक सुरळीत करण्यात आली.
प्राथमिक तपासानुसार, हा अपघात कारच्या वेगामुळे आणि कंटेनरच्या मागील बाजूस योग्य अंतर न ठेवल्यामुळे झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, पोलिसांनी याबाबत सखोल तपास सुरू केला आहे. कंटेनरचालकाचीही चौकशी सुरू असून वाहन जप्त करण्यात आले आहे.
मुंबई-गोवा महामार्गावर वेगमर्यादा ओलांडणे, बेदरकार वाहनचालक आणि रात्रीच्या वेळी मोठ्या वाहनांचा चुकीचा वापर यामुळे अपघातांचे प्रमाण वाढत आहे. विशेषतः लोणेरे, महाड आणि आसपासच्या भागात वारंवार घडणारे अपघात स्थानिक आणि प्रवाशांसाठी चिंतेचा विषय ठरत आहेत. या दुर्घटनेमुळे पुन्हा एकदा महामार्गावरील सुरक्षा उपाययोजनांबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
डॉ. प्रियांका आहिर यांच्या मृत्यूमुळे त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, स्थानिक पातळीवर हळहळ व्यक्त केली जात आहे. जखमी व्यक्तीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत आणि तिची प्रकृती गंभीर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. पोलिसांनी अपघाताचा पंचनामा करून मृतदेह पुढील वैद्यकीय तपासणीनंतर नातेवाईकांच्या ताब्यात दिला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.